आदित्य ठाकरेंनी शेअर केली नाशिक अधिवेशनाची खास आठवण; बाळासाहेबांसोबतचा फोटो पाहून नेटकरी म्हणाले…

आदित्य ठाकरे यांनी नाशिक आंदोलनाचा आजोबा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

    नाशिक : राजकारणासाठी नाशिक (Nashik) हे ठिकाणी सध्या महत्त्वाचे ठरत आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नाशिकला भेट दिली तसेच अयोध्या मंदिर उद्घाटनाच्या (Ayodhya Ram Temple inauguration) दिवशी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संपूर्ण परिवारासह काळाराम मंदिराचे (Kalaram Mandir) दर्शन घेतले. यानंतर आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी नाशिक आंदोलनाचा आजोबा बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

    हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. यानिमित्ताने अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना अभिवादन केले. यामध्ये सर्वात लक्षवेधी पोस्ट ही आदित्य ठाकरे यांची ठरली आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या आजी-आजोबांसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत नाशिक अधिवेशनाची एक आठवण… असे कॅप्शन दिले आहे. या फोटोमध्ये लहानपणीचे आदित्य ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे व माई ठाकरे यांच्यासोबत अधिवेशनामध्ये सहभागी होताना दिसत आहे.

    बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आदित्य ठाकरे यांनी खास शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘साहेब, तुम्ही दिलेली ‘महाराष्ट्र धर्माची’ मशाल आम्ही सदैव धगधगत ठेवू…! आमच्या पीढीचा एक सुसंस्कृत नेता असल्याचा तुमचा आम्हाला अभिमान आहे.’ अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे ‘या देशाला आदित्य ठाकरे यांच्यासारख्या शिक्षित व सुसंस्कृत नेत्याची गरज आहे.’ असे लिहिले आहे.