एकनाथ शिंदे नॉटरिचेबल; शिवसेनेची तातडीची बैठक

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार, खासदारांसह नेत्यांना मुंबईत तातडीने दाखल होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात कोण कोण आहे, याची माहिती ठाकरे सरकारकडून घेतली जात आहे.

    मुंबई : विधान परिषद निकाल (MLC Election) आणि शिवसेना नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नॉटरिचेबल (Not Reachable) आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मतदारसंघात निघालेल्या आमदारांना पुन्हा मुंबईत बोलावले आहे. शिवसेनेतर्फे तातडीने बैठक बोलवण्यात आली आहे. दरम्यान, शिंदे हे सुरतमध्ये (Surat) असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.

    मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार, खासदारांसह नेत्यांना मुंबईत तातडीने दाखल होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात कोण कोण आहे, याची माहिती ठाकरे सरकारकडून घेतली जात आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) दिल्लीला जाणार होते. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीसाठी ते हजेरी लावणार होते. मात्र, एकनाथ शिंदेंबद्दलच्या घडामोडी सुरू झाल्यानंतर त्यांनी तात्काळ दौरा रद्द केला आहे. तर, छगन भुजबळही (Chhagan Bhujbal) नाशिकमधल्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार होते. मात्र त्यांनीही आता आपले दौरे रद्द केले आहेत.

    अपक्ष आमदारांप्रमाणेच शिंदे समर्थक आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. गेली अडीच वर्ष आम्हाला फारशी किंमत दिली जात नव्हती. आता मात्र आम्हाला नव-नवे आदेश देऊन अविश्वास दाखवला जात आहे, अशी भावना शिंदे समर्थक आमदारांनी खासगीत मांडली आहे. नगरविकास मंत्री शिदे यांना मानणारा मोठा गट शिवसेनेत आहे. त्यांच्या मनातील खदखद बाहेर काढत आहेत. पक्षातील नव्या नेतृत्वाच्या ‘स्टाईलवर’ आक्षेप घेऊन ही वादाची ठिणगी पडली आहे. या ठिणगीचा वणवा आता मातोश्री ते एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पेटण्याची शक्यता आहे. शिंदे समर्थकांनी आपला रोख युवासेनेचे नेते, पर्यटन मंत्री यांच्या दिशेने ठेवल्याचे मानले जात आहे.