ठरलं! राज्यात शिवभक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकत्र, शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा; पवारांची भूमिका काय?

काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत चर्चा झाली असून, वंचितला त्यात ना नाही, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. मविआचे घटक पक्ष म्हणून वाटचाल करायला यापुढे हरकत नसावी, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. हिंमत असेल तर निवडणुका घ्याव्यात, असं आव्हान शिंदे-फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी दिलंय.

  मुंबई : राज्याच्या राजकारणात नवीन युतीची घोषणा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं करण्यात आली. महाराष्ट्रातील राजकारणाचा आजपासून नवा अध्याय सुरू झाला आहे. कारण राज्यात शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची आज घोषणा झाली आहे. आज हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंतीचे (Birth Annivesary) औचित्य साधत शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. ज्या स्वप्नाची राज्याची जनता वाट पाहत होती, ती इच्छा पूर्ण झालीय. आम्ही प्रकाश आंबेडकरांसोबत (Prakash Ambedkar) पुढची वाटचाल एकत्र करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेले आहोत.

  …तर हिंमत असेल तर निवडणुका घ्याव्यात

  शरद पवार आमच्यासोबत येतील, अशी अपेक्षा यावेळी प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली. काँग्रेसने अद्याप याबाबत भूमिका स्पष्ट केली नसल्याचं त्यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी वंचितला स्विकारतील अशी आशा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत चर्चा झाली असून, मविआचे घटक पक्ष म्हणून वाटचाल करायला यापुढे हरकत नसावी, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. हिंमत असेल तर निवडणुका घ्याव्यात, असं आव्हान शिंदे-फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी दिलंय.

  लोकशाही, घटना वाचवण्यासाठी एकत्र- उद्धव ठाकरे

  आंबेडकर आणि ठाकरे यांच्या आडनावाला एक इतिहास आहे , एक विचार आहे. दोघांचेही आजोबा हे एकमेकांचे स्नेही होते. दोघांच्याही आजोबांनी समाजातील वाईट रुढी, परंपरा याच्यावर प्रहार, आघात केले. आता जे राजकारणात जे वाईट परंपरा, चाली चालल्या आहेत, त्यावर आघात करुन त्या तोडून टाकण्यासाठी एकत्र आलो असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय. दोन्ही विचारांचे कार्यकर्ते आहेत, ते एकत्र मिळून देश प्रथम यासाठी काम करणार असल्याचं सांगितय. सध्या देशात हुकुमशाहीकडे नेण्यासाठी भ्रम पसरवण्याचं काम सुरु असल्याची टीकाही त्यांनी केलीय. नको त्या वादात लोकांना अडकवून ठेवायचं आणि आपलं इप्सित साध्य करायचं असं सुरु आहे. यातून सुरु असलेल्या वैचारिक प्रदूषणातून देशाला मोकळा श्वास मिळवून देण्यासाठी, लोकशाहीसाठी, संविधानाचं पावित्र्य ठेवण्यासाठी एकत्र येत आहोत. असंही उद्धव ठाकरे यांनी सांगतिलं. पुढची राजकीय वाटचाल ही विचार विनिमयानं ठरवू, असंही ते म्हणाले. तळागाळातील जनतेपर्यंत देशात चाललंय ते पोहचवण्याची गरज आहे. पंतप्रधानांच्या सभेला कोणं आलं, काय सांगतिलं होतं. हे आपल्याला माहित आहे. निवडणुकांपूर्वी केवळ गरिबांचं नाव घ्यायचं आणि नंतर मात्र गरीब रस्त्यावर आणि भाजपाचे उद्योग सुरु अशी टीकाही त्यांनी केलीय. हे थांबवण्याची गरज आहे.

  पवार आमच्यासोबत येतील अशी आशा – आंबेडकर

  ही युती बदलाचं राजकारण आणेल, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. सामाजिक प्रश्नांना ज्या ज्या वेळी हात घातला जातो, तेव्हा राजकीय गणित बदलतात, असं आंबेडकरांनी सांगितलं. उपेक्षितांचं राजकारण करावं, अशा पद्धतीचं राजकारण सुरु केलं होतं. उमेदवारी देण्याचं सार्वत्रिकीकरण होईल, अशी अपेक्षा होती. राज्यातील घराणेशाहीच्या राजकारणावर त्यांनी टीका केली. काही कुटुंबांमध्ये राजकारण आत्तापर्यंत सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात लुटारु आणि भांडवलशाही असणाऱ्यांची सत्ता असल्याचं सांगितलं आहे. शरद पवार हे आमच्यासोबत येतील, अशी अपेक्षा आंबेडकरांनी व्यक्त केली. या देशातील राजकीय नेतृत्व संपवण्याचा कट सुरु असल्याची टीका त्यांनी केलीय. चारित्र्यहनन, जेलवारीतून हे सगळे सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांनी पक्षातील सक्षम नेतृत्व मारुन टाकल्याची टीका त्यांनी केलीय. राष्ट्रीय पातळीवर नवं नेतृत्व उभं राहयला हवं, असं त्यांनी सांगितलंय.