शिवतारेंनी उमेदवारी मागे न घेण्यासाठी आलेले फोन दाखवले; अजित पवार यांचा दावा

शिंदेसेनेचे विजय शिवतारे यांनी अजित पवार विरोेधामध्ये आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र नंतर माघार घेत पाठिंबा दिला. या प्रकरणानंतर अजित पवार यांनी भरसभेमध्ये भाष्य केले असून विरोधकांवर निशाणा साधला आहे. 

    बारामती: लोकसभेची निवडणूक जवळ आल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही पवार घराण्यामध्येच होणार असल्याने सर्वांना उत्सुकता लागली आहे. शिंदेसेनेचे विजय शिवतारे यांनी अजित पवार विरोेधामध्ये आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र नंतर माघार घेत पाठिंबा दिला. या प्रकरणानंतर अजित पवार यांनी भरसभेमध्ये भाष्य केले असून विरोधकांवर निशाणा साधला आहे.

    माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासोबत आपली बैठक झाल्यानंतर त्यांनी उमेदवारी मागे घेऊ नये यासाठी त्यांना कोणाचे फोन आले, ते मला दाखवले, ते फोन पाहिल्यानंतर मला फार वाईट वाटले, अशी खंत व्यक्त करत राजकारण कोणत्या पातळीवर आले आहे, याची जाणीव मला झाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना सांगितले.
    बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी माजी पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

    यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “विजय शिवतारे मला भेटण्यासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी उमेदवारी मागे घेऊ नये, यासाठी रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत कोणाचे फोन आले, हे मला दाखवले. त्यांच्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील शिवतारे यांनी उमेदवारी मागे घेऊ नये, यासाठी मध्यरात्री फोन काहींनी केल्याचे समजले. हे फोन कोणाचे आहेत, कळल्यानंतर मला फार वाईट वाटले. ज्यांच्यासाठी मी जीवाचे रान केले, त्यांनीच माझ्याविरुद्ध असे काम करणे अतिशय दुःखदायक आहे. हृदयात कुठेतरी दुखतं म्हणून हे बोलावं लागतं,” अशी टिप्पणी पवार यांनी यावेळी व्यक्त केली. माजी राज्यमंत्री दादा जाधवराव हे माहितीचा प्रचार करणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले.