
राष्ट्रवादीतून अजित पवार यांनी थेट बंड पुकारत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर सांगली जिल्ह्याची जबाबदारी देखील त्यांनी स्वतःकडे घेतली, आता तर थेट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असणारे जयंत पाटील यांना आव्हान देत, जिल्ह्यात महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे घेण्यात त्यांना यश आले आहे.
सांगली : राष्ट्रवादीतून अजित पवार यांनी थेट बंड पुकारत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर सांगली जिल्ह्याची जबाबदारी देखील त्यांनी स्वतःकडे घेतली, आता तर थेट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असणारे जयंत पाटील यांना आव्हान देत, जिल्ह्यात महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे घेण्यात त्यांना यश आले आहे. हा जयंत पाटील यांना मोठा धक्का समजला जात आहे.
सांगलीचे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी महापौर नितीन सावगावे, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, विट्याचे वैभव पाटील, इस्लामपूर बाजार समितीचे माजी सभापती स्वरूपराव पाटील, जिल्हा बँकेचे माजी संचालक डॉ. प्रताप पाटील आदी अनेकांनी बुधवारी राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार गटात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले. या नेत्यांची मुंबईत बैठक झाली. त्यावेळी सत्तेच्या माध्यमातून विकास कामे करण्याचे व त्या माध्यमातून पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले.
राज्यातील राजकीय परिस्थिती बदल्ल्यानंतर अनेकजण अजित पवार गटात जात असताना माजी महापौर इद्रिस नायकवडी, नगरसेवक योगेंद्र थोरात, वगळता बाकी मंडळी जयंत पाटील यांच्याबरोबर असल्याचे म्हटले जात होते. मात्र जिल्ह्यातील अनेकजण अजित पवार यांच्या गटात गेल्याचे स्पष्ट झाले.
अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यातील गट बांधणीची जबाबदारी स्वतःकडे घेतल्याचे जाहीर केल्यानंतर दोन दिवसातच जयंत पाटील यांना मोठा धक्का दिला. पवार यांनी मुंबईत जिल्ह्यातील नेत्यांची बैठक बोलवली होती. बैठकीस माजी महापौर सूर्यवंशी, माजी महापौर सावगावे, सांगली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष प्रा. जगदाळे, विट्याचे युवक नेते वैभव पाटील, इस्लामपूर बाजार समितीचे माजी सभापती स्वरुपराव पाटील, जिल्हा बँकेचे माजी संचालक डॉ. प्रताप पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण खरमाटे, सुरेखा लाड, बाळासाहेब पाटील, आर. डी. पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सुरुवातीला सर्वांनी त्यांची मते व्यक्त केली.
याबाबत प्रा. जगदाळे म्हणाले, शहरासह जिल्ह्याचा विकास झाला नाही. त्यामुळे आम्ही अजित पवार गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी सांगलीसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
अजित पवार म्हणाले, केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार सक्षमपणे काम करत आहे. त्याप्रमाणे आपणाला राज्यात काम करायचे आहे. सत्तेच्या माध्यमातून विकास करायचा आहे. त्यासाठी मदत करू, असे पवार यांनी सांगितले आहे.
पदाधिकारी निवडी आठवड्यात
अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यासह पदाधिकारी निवडी पुढील आठवड्यात होणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. पक्ष बांधणीसाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे प्रा. जगदाळे यांनी सांगितले.