धक्कादायक! सततच्या भांडणाला कंटाळून वडिलांनीच केला मुलाचा खून

सततच्या भांडणाला कंटाळून मोशीमध्ये वडिलांनीच मुलाचा खून केल्याची घटना घडली आहे. युवराज सावळे (वय २२) असे खून करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणात त्याचे वडिल अशोक सावळे (वय ४७) यांना अटक करण्यात आली आहे.

    पिंपरी : सततच्या भांडणाला कंटाळून मोशीमध्ये वडिलांनीच मुलाचा खून केल्याची घटना घडली आहे. युवराज सावळे (वय २२) असे खून करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणात त्याचे वडिल अशोक सावळे (वय ४७) यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना सावले यांच्या राहत्या घरी शुक्रवारी पहाटे दोन वाजता घडली. सततच्या भांडणाला कंटाळून अशोक यांनी मुलाचा खून केल्याचे पोलीसांनी सांगितले.

    भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील म्हणाले, अशोक सावळे त्यांच्या पत्नी व दोन मुलांबरोबर मोशी येथील जुन्या जकात नाक्याजवळ राहतात. युवराज हा त्यांचा छोटा मुलगा आहे. तो तापट स्वभावाचा असल्याने त्याचे सतत भांडणे होत. आई, वडील व मोठ्या भावासोबत त्याचे वारंवार भांडणे होत असत. आज पहाटे सुद्धा भांडण झाले. सततच्या भांडणाला कंटाळून अशोक सावले यांनी युवराजच्या डोक्यात लोखंडी पाइपने मारले व धारदार कटरने त्याच्या गळ्यावर वार केले त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी वडिलांनी पोलिसांना फोन करून याबद्दल सांगितले. आरोपीवर भा. द. वि. कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत आहे.