कल्याण मधील धक्कादायक घटना, भटक्या श्र्वानाची दगडाने ठेचून हत्या, घटना मोबाईल कॅमेरात कैद

    कल्याण : भटक्या कुत्र्याच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना कल्याण पूर्वेकडील पिसवली परिसरात घडली. ही घटना मोबाईल कॅमेरात कैद झाली आहे. काही नागरिक या व्यक्तीला विरोध करत असताना देखील त्याने हे कृत्य केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या श्वानाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. याप्रकरणी निर्दयी ओम प्रकाश सिंह यांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

    कल्याण पूर्व येथील मलंग रोड पिसवली लगतच्या 50-50 धाब्या नजीक असलेल्या नाल्याजवळ बसलेल्या एका मादी जातीच्या भटक्या श्वानाच्या डोक्यात ओम प्रकाशने दगड घालत त्याला गंभीर जखमी केले. मारहाणीमुळे श्वान वेदनेने विव्हळत होती. या संपूर्ण घटना मोबाईल कॅमेरात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ओम प्रकाश ला आजूबाजूचे नागरिक हे कृत्य करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत मात्र कोणाचेही न ऐकता ओमप्रकाश याने दोन मोठे दगड या कुत्र्याच्या डोक्यात घालून त्याला गंभीर जखमी केलेले दिसत आहे. प्राणी मित्रांनी या जखमी श्वानाला उपचारासाठी रुग्णालयात नेले मात्र गंभीर जखमी झालेल्या या श्वानाचा मृत्यू झालाय. याप्रकरणी अलाईज फॉर ॲनिमल फाउंडेशनच्या सोनाली वाघमारे यांनी तात्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत प्राणी मित्रांच्या मदतीने या श्वानाचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणला. या निर्दयी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मानपाडा पोलिसांनी या गंभीर घटनेची दाखल घेत ओमप्रकाश विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.