पंढरपूरमध्ये धक्कादायक घटना! रेल्वेखाली चिरडून दोघे जागीच ठार ; दोघे गंभीर जखमी

पंढरपूर येथे रेल्वेने चौघांना चिरडले असून यातील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची मोठी दुर्घटना बुधवारी सकाळी समोर आली आहे. मिरजकडून कुर्डुवाडीच्या दिशेने निघालेल्या मालवाहतूक रेल्वेने पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चौघांना उडवले आहे. टाकळी येथील रेल्वेच्या पुलावर ही दुर्घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे.

    पंढरपूर : पंढरपूर येथे रेल्वेने चौघांना चिरडले असून यातील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची मोठी दुर्घटना बुधवारी सकाळी समोर आली आहे. मिरजकडून कुर्डुवाडीच्या दिशेने निघालेल्या मालवाहतूक रेल्वेने पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चौघांना उडवले आहे. टाकळी येथील रेल्वेच्या पुलावर ही दुर्घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे. रेल्वेने चौघांना चिरडले असून या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोघे जण अत्यंत गंभीर अवस्थेत असून त्याला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

    जखमी रुग्णांना 108 क्रमांक रुग्णवाहिकेत घालून डॉ ऋषिकेश गोगले व ड्रायव्हर सचिन आयरे यांनी सोलापूरला हलवले. सदर मृत आणि जखमी हे छत्तीसगड येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत. घटनेच्या दुतर्फा लोक वसाहत असून आज सकाळी काही नागरिकांनी हा प्रकार पहिला आणि याची माहिती शहरभर पसरली. अधिक माहिती मात्र अद्याप हाती आली नाही.

    रेल्वेने चिरडल्याने मृतदेहांची अवस्था अत्यंत छिन्न विच्छिन्न झालेली होती. एकाचवेळी आणि पहाटेच्या सुमारास चार जण कसे काय चिरडले गेले ? हा अपघात आहे की सामुदायिक आत्महत्या आहे ? असे प्रश्न नागरीकातून उपस्थित केले जात आहेत. हे चौघे या ठिकाणी कशासाठी गेले होते याचीही काही माहिती उपलब्ध झालेली नसून मृतांची नावे देखील समजू शकली नाहीत. या घटनेने सकाळी सकाळीच पंढरीला हादरवून टाकले आहे. सकाळपासून या घटनेची चर्चा पंढरीत सुरु आहे.