टिटवाळा परिसरातील धक्कादायक घटना, किरकोळ वादातून पतीने केली पत्नीची हत्या, ड्रम मध्ये मृतदेह टाकून जंगलात फेकला

    कल्याण : पत्नी रिक्षा घेण्यासाठी माहेरून पैसे आणत नसल्याने पतीने फावड्याच्या दांड्याने मारहाण करत गळा आवळून पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण जवळ टिटवाळा परिसरात उघडकीस आलाय. हत्येनंतर पत्नीचा मृतदेह एका ड्रम मध्ये भरून ड्रम जंगलात फेकुन दिला होता. अलीमुन अन्सारी असे मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिसानी निर्दयी पती मेनुद्दीन अन्सारी याला बेड्या ठोकल्यात. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    कल्याण जवळ टिटवाळा मांडा परिसरात मेनुद्दीन अन्सारी हे आपली पत्नी अलीमुन व 10 वर्षाच्या मुलासह राहतात. मेनुद्दीनला रिक्षा घ्यायची असल्याने तो अलीमुनकडे माहेरून पैसे घेऊन ये असा तगादा लावत होता. या कारणावरून मेनुद्दीन व अलीमुन मध्ये नेहमीच वाद व्हायचे. त्यांचा दहा वर्षाचा मुलगा शाळेत गेला असताना पुन्हा या दोघांमध्ये वाद झाले त्यामुळे संतापलेला मेनुद्दीन ने फावड्याच्या दांड्याने पत्नी अलीमुन हिला मारहाण केले त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर कुणाला संशय येऊ नये म्हणून त्याचा मृतदेह एका ड्रम मध्ये भरून हा ड्रम टिटवाळा जवळच्या एका जंगलात फेकून दिला. घटनेची माहिती तिच्या वडिलांना दिली व तुम्ही पण पोलीस स्टेशनला या असे सांगितले. माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. निर्दयी मेनुद्दीन याला टिटवाळा पोलीसानी बेड्या ठोकल्यात.