नाशिकच्या इगतपुरीतील आदिवासी पाडय़ातील धक्कादायक घटना, रस्त्याअभावी अडीच किलोमीटर डोलीतून नेलेल्या गर्भवतीचा मृत्यू, अधिवेशनात पडसाद उमटण्याची शक्यता

इगतपुरीतील तळोघ ग्रामपंचायतीमध्ये जुनवणेवाडीमध्ये त्या राहत होत्या. या आदिवासी वस्तीतील ग्रामस्थांना तळोघ येथे मुख्य रस्त्यापर्यंत जाण्यासाठी अडीच किलोमीटर कच्च्या रस्त्याने पायपीट करावी लागते

    नाशिक : राज्यात मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं मोठे नुकसान झालं आहे, कुठे शेतीचे पिके उपटून गेली आहेत, तर कुठे रस्ताच वाहून गेला आहे. नाशिकच्या इगतपुरीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रस्ता नसल्यानं गावकऱ्यांनी गर्भवती महिलेला डोलीतून नेले होते. प्रसववेदना असह्य झालेल्या गर्भवती महिलेला ग्रामस्थांनी अडीच किलोमीटपर्यंत डोलीने नेले. मात्र, हा कसरतीचा प्रवास आणि दोन रुग्णालयांमध्ये डॉक्टरच उपलब्ध न झाल्याने तिसऱ्या रुग्णालयात दाखल करताना झालेला विलंब यामुळे या महिलेला प्राण गमवावा लागला. या घटनेमुळं संताप व्यक्त केला जात आहे.

    सरकार अजून आदिवासी पाडय़ांपर्यंत पोहोचले नाही

    दरम्यान, या घटनेचे पडसाद अधिवेशनात देखील उमटण्याची शक्यता आहे.‘वनिता भगत असे या महिलेचे नाव आहे. इगतपुरीतील तळोघ ग्रामपंचायतीमध्ये जुनवणेवाडीमध्ये त्या राहत होत्या. या आदिवासी वस्तीतील ग्रामस्थांना तळोघ येथे मुख्य रस्त्यापर्यंत जाण्यासाठी अडीच किलोमीटर कच्च्या रस्त्याने पायपीट करावी लागते. निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान’, अशी जाहिरातबाजी करून राज्य सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेत असले तरी हा विकासवेग आदिवासी पाडय़ांपर्यंत पोहोचलेला नसल्याचा प्रत्यय मंगळवारी इगतपुरीत आला. यामुळं सरकार व प्रशासनावर टिका होत आहे.

    कच्चा रस्ता पावसामुळे चिखलमय

    काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं रस्त्या चिखलमय झालेला आहे. वनिता भगत यांना प्रसवेदना सुरू झाल्याने मंगळवारी रात्री अडीच वाजता नातेवाईकांनी डोलीने अडीच किलोमीटरवरील तळोघपर्यंत नेले. पण ती वेळेत न पोहचू शकल्यामुळं तिचा मृत्यू झाला. जेव्हा इगतपुरी येथील शासकीय दवाखान्यात नेण्यात आले. तिथे डॉक्टर उपस्थित नसल्याने वाहनातून पुन्हा वाडीवऱ्हे येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, या रुग्णालयात केवळ परिचारिका उपस्थित होत्या. वनिता यांची अवस्था पाहून त्यांनी तिला नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले.