धक्कादायक! मित्राच्या मदतीने मुलीकडून आईचा खून; वडगाव शेरीतील घटनेने खळबळ; मुलीसह दोघांना अटक

  • Murder of mother by daughter

पुणे : पुण्यातील वडगाव शेरी परिसरात मित्राच्याच मदतीने १८ वर्षीय मुलीने आईच्या डोक्यात हातोडा घालून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इतकेच नाही तर खूनानंतर ती बाथरूममध्ये घसरून पडल्याचा बनाव देखील केला. पोलिसांनी केलेल्या तपासात तिने आईच्या गुपचूप तिच्या बँक खात्यावरून मित्राला ऑनलाईन पैसे पाठविले. ते पैसे वेळोवेळी काढले अन् खर्चही केले. पण, घटनेच्या दिवशी अचानक आईने बँकेत जाऊ आणि पैसे काढू असे म्हणू लागली अन् आता आपण पैसे काढत असल्याचे आईला कळणार आणि ती रागवणार या भितीने मुलीने तिचा खून केल्याचे उघड झाले आहे.

चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मंगल संजय गोखले (वय ४५, रा. वडगाव शेरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलगी योशिता संजय गोखले (वय १८) आणि तिचा मित्र यश मिलींद शितोळे (वय २४, रा. गणेशननगर) यांना अटक केली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही वर्षांपासून आईचे मुलीला घेऊन पुण्यात वास्तव्य

गोखले कुटूंब मुळचे चेंबुरमधील आहे. गेल्या काही वर्षांपासून मंगल या मुलीला घेऊन पुण्यातील वडगाव शेरी येथे राहत होत्या. मंगल या घर काम करत होत्या. दरम्यान, योशिता हिचे बारापर्यंतचे शिक्षण झाले आहे. यश शितोळेचे आयटीआयचे शिक्षण झाले आहे. या दोघांची गेल्या काही वर्षांपासून मैत्री आहे.

आईच्या खात्यातून मित्राला दीड लाख रुपये पाठविले

दरम्यान, मंगल गोखले या काम करून पैसे जमा करत असत. त्या बँकेत पैसे ठेवत होत्या. याची माहिती मुलगी योशिता हिला होती. तिने मित्राला आणि तिला पैसे लागल्यानंतर आईच्या बँक खात्यातून मित्र यश याच्या खात्यावर टाकत होती. तेथून ते पैसे काढून घेत. तर, आईच्या बँक खात्यातूनही तिने वेळोवेळी चेकद्वारे पैसे काढले होते.काही महिन्यात दोघांनी एक ते दीड लाख रुपये काढले होते.

बिंग फुटल्यास आई रागवणार या भितीने केला खून

दरम्यान, १ एप्रिल रोजी योशिताला आईने पैशांची गरज आहे. उद्या आपण बँकेत जाऊ आणि पैसे काढू असे सांगितले. हे एकूण योशिता घाबरली. तिला आपण आईच्या खात्यातून पैसे काढल्याची माहिती होणार आणि ती रागवणार, याची भिती वाटू लागली. तिने मित्र यश याला याची माहिती दिली. दोघांनी तिचा खून करण्याचा कट रचला. तसेच, झोपेत असताना घरातील हातोडा यश याला दिला. यशने मंगल यांच्या डोक्यात हातोड्याने वार करून जखमी केले. तर योशिताने आईचे स्कार्फने तोंड दाबून धरले. यात मंगल यांचा मृत्यू झाला.

बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याचा बनाव

मृत्यूनंतर योशिताने हा प्रकार कोणाला कळू नये, यासाठी आई बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने तिच्या डोक्याला दुखापत झाल्याचा बनाव रचला, आणि नातेवाईक व इतरांना याची माहिती दिली.दरम्यान, याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांना मात्र, संशय येत होता. मंगल यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार झाले. योशिता व कुटूंब पुण्यात आल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. योशिताकडे ती बाथरूममध्ये कशी पडली, याबाबत विचारले. तेव्हा तिच्या बोलण्यातून संशय आणखीनच वाढला. यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला. त्यावेळी दोघांनी तिचा खून केला आणि ती पाय घसरून पडल्याचा बनाव रचला असल्याचे समोर आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.