So far action has been taken against 113 gangs
Pune Crime

  पुणे : मुळशी परिसरातील एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या पौड पोलिसांच्या पथकावर सराईताने त्याचे पाळीव श्वान सोडल्याची धक्कादायक घटना घडली. मुळशीतील रिहे गावात ही घटना घडली असून, पोलिसांनी गोळीबार करू असे सांगितल्यानंतर तो पोलिसांना शरण आला. या प्रकरणी सराईताला पौड पोलिसांनी अटक केली. मंगेश पालवे (वय ३२, रा. रिहे, ता. मुळशी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

  मोक्का कारवाईनंतर तो येरवडा कारागृहात

  या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. मंगेश पवळे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. मंगेश याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. मोक्का कारवाईनंतर तो येरवडा कारागृहात होता. त्याला न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती पौड पोलिसांनी दिली.

  पाळीव श्वान सोडले पोलीस पथकाच्या अंगावर

  शनिवारी पवळेने रिहे गावात एकाला पिस्तुलाचा धाक दाखवून ११ हजारांची रोकड लुटली होती. ही माहिती पौड पोलिसांना मिळाली. त्यानंतर पौड पोलिसांचे पथक रिहे गावात पोहोचले. पोलिसांना पाहताच पवळेने त्याचे पाळीव श्वान पोलीस पथकाच्या अंगावर सोडले. श्वान पोलिसांच्या अंगावर धावून गेल्याने पोलिसांना त्याचा ताब्यात घेता आला नाही. मंगेश लगेच घरात गेला. त्याने खिडकीतील काचेने स्वत:वर वार करून घेत बिअरची बाटली डोक्यात फोडून आत्महत्येचा प्रयत्न केला.  मंगेश पवळेने याच्या श्वानाला पकडण्यास पोलिसांनी वनविभागाला माहिती दिली.

  मंगेश पवळे पोलिसांना शरण

  पोलिसांनी मंगेश पवळेला शरण येण्याचे आवाहन केले. शरण न आल्यास गोळीबार करु, असे पोलिसांनी त्याला सांगितले. त्यानंतर मंगेश पवळे पोलिसांना शरण आला. पवळेला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पालवेने शनिवारी रात्री रिहे गावात आणखी एका व्यक्तीला धमकावून लुटल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्यावर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.