धक्कादायक! कल्याणमध्ये सराफा दुकानावर दरोडा; तीन दुकानांच्या दोन भिंतींना भगदाड पाडून ज्वेलर्सचे दुकान लुटले

  कल्याण : कल्याणमधील बिर्ला कॉलेज परिसरात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन दुकानांच्या दोन भिंतींना भगदाड पाडून चोरटे ज्वेलर्सच्या दुकानात घुसले. मात्र,  कटर मशिनचा गॅस अचानक बंद झाल्याने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. चोरटे मुख्य लॉकर तोडू शकले नाही. मात्र, दुकानाच्या शोकेसमधील दागिने घेऊन चोरटे पसार झाले. काही दिवसांपूर्वी ज्वेलर्सच्या शेजारी दोन दुकाने सोडून काही तरुणांनी मोबाईल शॉप सुरू करण्यासाठी एक गाळा भाड्याने घेतला होता.

  दुकानफोडी केली असल्याचे सांगितले

  या तरुणांकडून ही दुकानफोडी केली असल्याचे सांगितले जात आहे. खडकपाडा पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. भाड्याने घर, दुकान देताना अजूनही निष्काळजीपणा केला जात असल्याचा प्रकार या घटनेमुळे समोर आला आहे.

  महालक्ष्मी ज्वेलर्सचे दुकान

  कल्याण पश्चिमेतील बिर्ला काॅलेज परिसरात महालक्ष्मी ज्वेलर्सचे दुकान आहे. आज सकाळी दुकानाचे मालक अशोक मोहिते जेव्हा दुकानात आले. तेव्हा दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त होते. दुकानाच्या आत जाऊन त्यांनी पाहिले. त्याठिकाणी गॅस कटर आणि सिलिंडर आढळून आला. दुकानाच्या भिंतीला मोठे भगदाड आले. त्यांच्या लक्षात आले की दुकान चोरट्यानी लुटले आहे. मात्र मुख्य लॉकर चोरटे फाेडू शकले नाही. कदाचित गॅस संपल्याने त्यांना लॉकर फोडता आला नाही. मात्र दुकानाच्या शोकेसमधील दागिने चोरून चोरट्यांनी पळ काढला आहे.

  दोन दुकानात भिंतीना भगदाड पाडले

  अशोक मोहिते यांनी पाहिले की, शेजारच्या दोन दुकानात भिंतीना भगदाड पाडले गेले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या दुकानाच्या रांगेतील दोन दुकाने सोडून काही तरुणांनी मोबाईल शॉप सुरु करण्यासाठी एक गाळा भाड्याने घेतला होता. ते तरुण गायब होते. जो गाळा भाड्याने घेतला होता. त्या गाळ्याच्या भिंतीलाही भगदाड पाडले. त्याच्या शेजारच्या भिंतीलाही भगदाड पाडले. मग ज्वेलर्स दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडले. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले आहे. ज्वेलर्स शारूममध्ये शिरताच चोरट्यांनी सीसीटीव्ही बंद केला होता. हे चोरटे नेपाळचे असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. या दुकानफोडीमुळे या परिसरात एकच खळबळ माजली आहे.