Shocking! Roommate friend sent offensive photos, videos to friend; An incident at a reputed engineering college in Pune

  पुणे : शहरातील शिवाजीनगर भागातील एका नामांकित इंजिनिअरींग कॉलेजमधील रूममेट मैत्रिणींचे छोट्या कपड्यांमधील फोटो काढून ते मित्राला पाठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तरुणीच्या मित्रासह तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

  तरुणीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  याप्रकरणी विनीत अजित सुराणा (सध्या रा. हिंजवडी) याच्यासह एका तरुणीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अभियांत्रिकी महाविद्यालयातील ४० वर्षीय कर्मचारी महिलेने तक्रार दिली आहे.

  तीन मैत्रिणींचे फोटो आणि व्हिडीओ काढले

  पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी शिवाजीनगर भागातील इंजिनिअरींग कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. कॉलेजचे गर्ल्स हॉस्टेल आहे. त्या ठिकाणी तरुणी आणि तिच्या तीन मैत्रिणी एकाच रूममध्ये राहतात. त्यावेळी तिने तिच्या रूममेट असलेल्या तीन मैत्रिणींचे फोटो आणि व्हिडीओ मोबाइलवर काढले. ते मित्र विनीतला पाठविले.

  आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो व व्हिडीओ आले आढळून

  गेल्या काही महिन्यांपासून तरुणी विनितच्या संपर्कात होती. विनितशी ती मोबाइलवर बोलत होती. त्यावेळी तिच्या मैत्रिणीने फोटो व व्हिडीओबाबतच्या गप्पा ऐकल्या. त्यानंतर मैत्रिणींनी तरुणीचा मोबाईल तपासला. तेव्हा आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो व व्हिडीओ आढळून आले. त्यानंतर याबाबतची तक्रार कॉलेज प्रशासनाकडे देण्यात आली.

  तक्रारीवर चौकशी समिती स्थापन

  विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवर चौकशी समिती स्थापन करण्यात आली. प्रशासनाने फोटो काढणाऱ्या तरुणीला निलंबित केले. आरोपी विनितने तरुणींची फोटो व व्हिडीओ कोणाला पाठविली आहेत का ?, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.