Smuggling of Ganja from Dhulea by Engineers

    पुणे : धुळ्याहून गांजाविक्री करण्यासाठी आलेल्या अभियंत्यासह तिघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कात्रज भागातून अटक केली. त्यांच्याकडून २७ किलो ३२५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे व रेहना शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

    या आरोपींना अटक

    हरिओम संजय सिंग (वय २१, रा. धुळे), करण युवराज बागुल (वय २३, रा. शिरपूर जि. धुळे), वसंत सुभाष क्षीरसागर (रा. आंबेगाव, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सिंग आणि त्याचा साथीदार बागुल कात्रज भागात गांजा विक्रीस येणार असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र लांडगे यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केली.

    चार लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

    पोलीस पथकाने सापळा लावून त्याच्याकडून चार लाख ८४ हजार रुपयांचा २७ किलो गांजा, दोन मोबाईल जप्त केले. क्षीरसागरने त्यांना गांजा विक्रीस दिल्याचे तपासात उघडकीस आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी सिंग इलेक्ट्रिक उपकरणे दुरुस्तीचा व्यवसाय करतो. त्याच्यावर शिरपूर पोलीस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात झाला होता. बागुलने स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत पदवी मिळवली आहे. यापूर्वी त्याच्यावर घरफोडीचा गुन्हा दाखल होता.