धुळ्यात पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन; दखल न घेतल्यास नग्नावस्थेत ठिय्या आंदोलनाचा इशारा

पाणीपुरवठा प्रश्‍न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. देवपूरातील लाला सरदार नगर, एकवीरा देवी मंदिर परिसरात गेल्या १२ दिवसांपासून नळांना पाणी आलेले नाही. लोकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत असल्याचा आरोप करत आज प्रभाग क्र. ३ ड चे एमआयएम पक्षाचे नगरसेवक सईद बेग, हाशम बेग कार्यकर्त्यांसह नवरंग पाण्याची टाकी येथील बांधलेल्या नव्या जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन करत आहेत.

    धुळे : शहरात पाणीपुरवठा प्रश्‍न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. देवपूरातील लाला सरदार नगर, एकवीरा देवी मंदिर परिसरात गेल्या १२ दिवसांपासून नळांना पाणी आलेले नाही. लोकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत असल्याचा आरोप करत आज प्रभाग क्र. ३ ड चे एमआयएम पक्षाचे नगरसेवक सईद बेग, हाशम बेग कार्यकर्त्यांसह नवरंग पाण्याची टाकी येथील बांधलेल्या नव्या जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन करत आहेत. जोपर्यंत नवीन जलकुंभ सुरु केला जात नाही, तोपर्यंत खाली उतरणार नाही. तात्काळ दखल घेतली नाही तर कपडे उतरवत टाकीवर नग्नावस्थेत ठिय्या देऊ, असा इशारा त्यांनी मनपा प्रशासनाला दिला.

    देवपूरातील लाला सरदार नगर, एकविरादेवी मंदिर रोड परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. या परिसरात खूप मोठया प्रमाणावर दाटवस्ती आहे. परंतु पिण्याच्या पाणी मिळवण्याकरिता नागरिकांना खुप भटकंती करावी लागते. काही भागांत पाणी मिळते तर काही भागात नाही. आणि मागील बर्‍याच कालावधी पासून या त्रासाला समोरे जावे लागत आहे. महानगरपालिकेत वारंवार तक्रार करावी लागते. त्यामुळे एमआयएमचे नगरसेवक सईद बेग, हाशम बेग यांनी यापूर्वी अनेक निवेदने वेळोवेळी मनपा प्रशासनाला दिलेले आहेत. ५ रोजी महासभेत देखील पत्र दिलेले आहे. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेवून विचार व्हावा. या भागात नवीन जलकुंभ उभारले गेले आहे. दोन वर्ष झाली नवीन टाकी तयार असूनही त्या जलकुंभातून पाणीपुरवठा सुरु केला गेलेला नाही. नवीन जलकुंभात किरकोळ दुरुस्तीची कामे बाकी असल्याचे मनपा अभियंते सांगतात मात्र आमदार शाह यांनी सूचना देवून सुद्धा ती दुुरुस्ती करुन नवीन जलकुंभ सुरु केले नाहीे.

    नविन जलकुंभ सुरु केला तर प्रभातनगर, गुलाब हाजी नगर, मदनी नगर, गौसिया नगर, विटाभट्टी, दुर्गा देवी मंदिर परिसर, आयशा नगर, लाला सरदार नगर, मोहम्मदी नगर, एकविरादेवी मंदिर परिसर, भाई मदाने नगर आणि पंचवटी परिसर इ. परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली लागेल व परिसरातील नागरीकांना दिलासा मिळेल मात्र मनपा प्रशासन आणि सत्ताधारी दुर्लक्ष करीत असल्याचा रोष यावेळी नागरीकांनी व्यक्त केला.

    नगरसेवक सईद बेग यांनी टाकीच्या थेट वरच्या स्लॅबवर ठिय्या मांडून आंदोलन सुरु केले. तर महिला, पुरुष नागरीक टाकी खाली उभेराहून घोषणाबाजी करीत होते. बराच वेळ हे आंदोलन सुरु होते. टाकीवरुन एक व्हिडीओ तयार करुन नगरसेवक बेग यांनी जो पर्यंत ही नवीन टाकी सुरु केली जात नाही तोपर्यंत आपण खाली उतरणार नाही, आणि दखल घेत नसाल तर एक -एक करुन कपडे उतरवत टाकीवर नग्नावस्थेत ठिय्या देऊ, असा इशारा नगरसेवक सईद बेग यांनी त्या व्हिडीओद्वारे मनपा प्रशासनाला दिला.