दुकाने सजली, ग्राहकांची पाठ; मंगळवेढ्यात दिवाळी खरेदीवर दुष्काळाचे सावट

मंगळवेढ्यात दिवाळीसाठी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने विद्युत रोषणाई करून थाटली असली तरी दुष्काळी परिस्थितीचा परिणाम जाणवत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचा अद्यापही पगार न झाल्यामुळे बाजारपेठेत ग्राहकाविना रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत असल्याचे चित्र आहे.

  मंगळवेढा : मंगळवेढ्यात दिवाळीसाठी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने विद्युत रोषणाई करून थाटली असली तरी दुष्काळी परिस्थितीचा परिणाम जाणवत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचा अद्यापही पगार न झाल्यामुळे बाजारपेठेत ग्राहकाविना रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत असल्याचे चित्र आहे.

  भारतीयांचा सर्वात मोठा सण म्हणून दिवाळी या सणाकडे पाहिले जाते. दिवाळी तोंडावर आली असतानाही मंगळवेढयातील बाजारपेठेत अद्यापही शुकशुकाट दिसून येत आहे. यंदा पाऊसमान अत्यल्प झाल्यामुळे तालुक्यावर दुष्काळाची गडद छाया आहे. याचा परिणाम दिवाळीच्या खरेदीवर झाल्याचे दिसून येत आहे. दिवाळी दोन दिवसावर आल्याने व्यापाऱ्यांनी कापड दुकाने, फटाक्याचे स्टॉल, आकाश कंदील, पणत्या व इतर दुकाने बाजारपेठेत विविध वस्तूंनी थाटली अाहेत. ते ग्राहकाच्या प्रतिक्षेत आहेत. शासकीय कर्मचाऱ्‍यांचा अद्यापही पगार न झाल्यामुळे त्यांनीही बाजारपेठेकडे पाठ फिरवली आहे.

  शेतकऱ्यांच्या ऊसाची बिले काही प्रमाणात साखर कारखान्यांनी खात्यावर जमा केल्यामुळे शेतकरऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. प्रतिवर्षी मंगळवेढा शहरात दिवाळी दरम्यान खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड उडत असते. यंदा मात्र याच्या उलट परिस्थिती दिसून येत आहे.

  फटाक्यांना मागणी नाही

  बाजार चौकात मंडईमध्ये एकंदरीत १५ फटाक्याचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. मात्र ग्राहक या स्टॉलकडे फिरकले नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. दामाजी चौक ते मुरलीधर चौक या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा बाजूस आकाशकंदीलाचे स्टॉल उभे असून येथेही हीच परिस्थिती असल्याचे व्यावसायिक दीपक नकाते यांनी सांगितले.

  आकाशकंदीलचे भाव जैसे ‌थे

  आकाशकंदीलमध्ये मागील तीन वर्षापासून चायना कंदील हद्दपार झाले असून भारतीय मॉडेलचे आकाशकंदील सर्वत्र उपलब्ध झाले आहेत. यामध्ये कापडी, कुंदनखडे, शिवाजी महाराज, वेलवेट, फायबर, थ्रीडी, फुलांच्या आकाराचे आदि विविध प्रकारामध्ये आकाशकंदील उपलब्ध आहेत. याच्या किंमती ५० रूपयापसाून २५० रुपयापर्यंत अाहेत. यंदा या किंमतीमध्ये कुठलीही वाढ झाली नसल्याचे सांगण्यात आले.

  पणती विक्रीलाही फटका

  दिवाळीत पणत्यांना अधिक महत्व असल्याने महिला वर्ग मोठ्या प्रमाणात पणत्या खरेदी करतो. मात्र यंदा या खरेदीवर दुष्काळाचे सावट जाणवत असल्याचे व्यावसायिका रूक्मिणी साळुंखे यांनी सांगितले. पणत्यामध्ये नारळ पणती, गुलाब पणती, उदाणी पणती, व छोटया मोठया स्वरूपात पणत्या विक्रीस उपलब्ध आहेत. ५० रूपये ते १०० रूपये प्रति डझन किंमत आहे.