हत्यारे घेऊन दहशत माजवीत टोळक्याकडून दूकानांची तोडफोड

हातात तलवार, कोयते, दांडके घेऊन व तोंडाला स्कार्प बांधुन आलेल्या सात-आठ जणांच्या टोळक्याने दहशत माजवीत पाच दुकानांची तोडफोड केली तर व्यावसायिकांना दादागिरी करीत सुमारे २० दुकाने बंद करण्यास भाग पाडले. हा प्रकार सोमवारी रात्री नऊच्या सुमारास कस्तुरी चौक ते भूमकर चौकाच्या दरम्यान घडला.

    पिंपरी : हातात तलवार, कोयते, दांडके घेऊन व तोंडाला स्कार्प बांधुन आलेल्या सात-आठ जणांच्या टोळक्याने दहशत माजवीत पाच दुकानांची तोडफोड केली तर व्यावसायिकांना दादागिरी करीत सुमारे २० दुकाने बंद करण्यास भाग पाडले. हा प्रकार सोमवारी रात्री नऊच्या सुमारास कस्तुरी चौक ते भूमकर चौकाच्या दरम्यान घडला. या घटनेनंतर भूमकर चौक परिसरातील विविध व्यावसायिक व नागरीकांत दहशत पसरली आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या हिंजवडी पोलिसांनी परिसरातील परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, संशयितांच्या मागावर ते आहेत.

    भूमकर चौकातील ममता स्वीटस, पुणे हार्डवेअर, एक मेडिकल यासह कस्तुरी चौकातील वाईन शॉपी अन् किराणा दुकानाच्या काउंटरची कोयता आणि दांडके मारुन तोडफोड करण्यात आली. हिंजवडी ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक डॉ. विवेक मूगळीकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नेहमीप्रमाणे भूमकर चौकात माणसांची गजबज व वाहनांची वर्दळ कायम होती अशा गर्दीत हातात हत्यारे घेऊन तीन-चार दुचाकींवरून व आलेल्या व तोंड झाकलेल्या तरुणांनी दुकान बंद करण्यासाठी दर्डावत तोडफोड सुरू केली.

    अचानक झालेल्या या प्रकाराने दुकानदार भांबावले तर लोकांचीही चांगलीच पळापळ झाली. भीतीने व्यावसायिकांनी दुकाने बंद करताच हे दहशतखोर दुचाकीवरून पसार झाले. मात्र, या प्रकाराननंतर नागरीकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी झाली होती. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.