कडलगेतील प्राथमिक शाळेत शिक्षकांची कमी

कडलगे बुद्रूक येथे मराठी विद्या मंदिर कडलगे बुद्रूकमध्ये दोन शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत सरपंच सुधीर गिरी यांनी गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे व गटशिक्षणाधिकारी सुभेदार मॅडम यांचेकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.

    कोल्हापूर : कडलगे बुद्रूक येथे मराठी विद्या मंदिर कडलगे बुद्रूकमध्ये दोन शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत सरपंच सुधीर गिरी यांनी गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे व गटशिक्षणाधिकारी सुभेदार मॅडम यांचेकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.

    कडलगे येथे मराठी विद्या मंदिर पहिली ते सातवीपर्यंत १०४ पट विद्यार्थी संख्या असलेली शाळा सुरू आहे. शाळेत एकूण पाच शिक्षक होते. एक महिन्यापूर्वी एक शिक्षक पदोन्नतीने बदलीवर गेले.  दुसऱ्या एक शिक्षिका ३० जुनला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. सध्या शाळेत तीन शिक्षक आहेत, त्यापैकी एक शिक्षिका मुख्याध्यापक चार्ज असल्याने त्या शाळेच्या व प्रशासकीय कामातच व्यस्त असतात तर दोन शिक्षकांनी सात वर्ग सांभाळले अशक्य आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षणाविना फार मोठे नुकसान होणार आहे.

    कडलगे गावातील ग्रामस्थांनी पस्तीस वर्षापूर्वी शाळेतील शिक्षक वसंत जोशीलकर सर यांच्या सहकार्याने वर्गणी जमा करून तालुक्यातील पहिली स्लॅबची दुमजली इमारत बांधली. त्याचे तालुक्यातील व जिल्ह्यातील तसेच शासकीय स्तरावरून भरभरून कौतुक झाले होते. असे असले तरी योग्य शिक्षकाविना कडलगे शाळेतील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने पालकवर्ग व ग्रामस्थांतून तीव्र नाराजी आहे.

    लोकनियुक्त सरपंच  सुधीर गिरी यांनी गटविकास अधिकारी यांना शिक्षक देण्यासाठी विनंती केली असता तालुक्यातील शाळांमध्ये ११० शिक्षक कमी असल्याचे व चार ते पाच शाळांमध्ये शुन्य शिक्षक असल्याचे सांगितले. आपण तालुक्यातील आलेली निवेदन शासनाच्या निदर्शनास आणून दिले असून शिक्षक भरती प्रक्रियाच बंद असल्याने अधिकारी लोकांना अनेक अडचणी येत असल्याचे चंद्रकांत बोडरे यांनी सांगितले. निवेदन देताना लोकनियुक्त सरपंच सुधीर गिरी, उपसरपंच रेश्मा पाटील, सदस्य दत्तू पाटील, तुकाराम सुतार, एकनाथ कांबळे, मिरा कांबळे, चंद्रभागा पाटील, रेणुका राऊत, शाळा समिती अध्यक्ष रोहिणी पाटील, उपाध्यक्ष दौलत पाटील, सदस्य रविंद्र पवार आदी उपस्थित होते.