मोबाईल हिसकावण्याच्या प्रयत्नात डाव फसला; मलकापुरात भरदिवसा हवेत गोळीबार केला

रेल्वे स्थानकावरून मोबाईल हिसकावून पळताना रेल्वे पोलिस आणि नागरिक मागे लागल्याने जीव वाचविण्यासाठी चोरट्यांनी चक्क हवेत गोळीबार केला. ही घटना मलकापूर रेल्वेस्थानक परिसरात घडली. गोळीबाराच्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली.

    मलकापूर / बुलडाणा : रेल्वे स्थानकावरून मोबाईल हिसकावून पळताना रेल्वे पोलिस आणि नागरिक मागे लागल्याने जीव वाचविण्यासाठी चोरट्यांनी चक्क हवेत गोळीबार केला. ही घटना मलकापूर रेल्वेस्थानक परिसरात घडली. गोळीबाराच्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली.

    मलकापूर रेल्वे स्टेशनवर गंगानगर एक्स्प्रेस फलाट क्र. एकवर आली. या फलाटावर तिघेजण बसले होते. त्यांनी एका प्रवाशाचा मोबाइल हिसकवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार आरपीएफ जवानांच्या लक्षात आला. त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिघेही रेल्वे स्टेशनच्या संरक्षण भिंतीवरून उड्या मारून रामवाडी भागातील रस्त्याने पळायला लागले.

    रेल्वे पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. हा प्रकार उपस्थित नागरिकांना दिसला त्यांनीही त्यांना पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याचवेळी नांदुरा रोडवर उभा असलेल्या एका रिक्षात तिघेही बसले. रिक्षा सरळ नांदुरा दिशेकडे निघून गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात दिसून आले. त्याचप्रमाणे रिक्षात बसलेल्या तिसऱ्या इसमाच्या हातात पिस्तुल दिसत होते. रामवाडी भागातील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार ते तिघेही रेल्वे स्टेशनकडून धावत येत होते.

    दरम्यान, त्यांनी हवेत फायर केले, तर पोलिस प्रशासनाच्या म्हणण्यानुसार हे तिघे चोरटे असण्याची शक्यता आहे. त्यांना पकडण्यासाठी पाठीमागे लोक धावत असावेत म्हणून त्यांनी हवेत गोळीबार केला असावा असा अंदाज पोलिस निरीक्षक अनिल गोपाळ यांनी व्यक्त केला. याप्रकरणी रिक्षाचा शोध घेऊन घटना स्पष्ट झाल्यावर पुढील शोध तपास सुरू करण्यात येईल अशी माहिती पोलिस निरीक्षकांनी दिली.