किल्ले रांगणावर हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण राजापूरचे श्रमदान, किल्ल्याची केली साफसफाई

गडकिल्ल्यावर येणाऱ्या लोकांना विहीर वा अन्य ठिकाणांहून पिण्यासाठी पाणी आणावे लागते. लोकांची ही होणारी गैरसोय लक्षात घेऊन हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी किल्ल्यावरील विहिरीतील दीड-दोन फूट गाळ उपसा केला.

    स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची अनुभूती घेण्याच्या उद्देशाने तालुक्यातील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी किल्ले रांगणाला भेट दिली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गाच्या हद्दीवर वसलेल्या किल्ले रांगणावरील संगणाई मंदिराच्या बाजूची विहिग्रेतील गाळ, घाण काढून आणि नारूर गावात उतरणारी कोकण दरवाजा ही वाट श्रमदानाने स्वच्छ केली.

    शहरातील जवाहर चौकातील शिवस्मारकाच्या येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिजित नार्वेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि हिंदू जनजागृती समितीचे विनोद गादीकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या गहकिल्ले भेट मोहिमेचा प्रारंभ झाला. या वेळी प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष महेश मयेकर, मोहीम समन्वयक विवेक गुरव, शिवस्मृती मंडळाचे अध्यक्ष दिलीप चव्हाण, दीनानाथ कोळवणकर, दिलीप गोखले, सूरज पेडणेकर, चंद्रशेखर मोंडे, ॲड. पराग मोदी, प्रवीण बाणे, मोहन घुमे, मंदार बावधनकर, निकेश पांचाळ, सुधीर विचारे यांच्यासह मोठ्या संख्येने प्रतिष्ठानचे शिलेदार उपस्थित होते.

    गडकिल्ल्यावर येणाऱ्या लोकांना विहीर वा अन्य ठिकाणांहून पिण्यासाठी पाणी आणावे लागते. लोकांची ही होणारी गैरसोय लक्षात घेऊन हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी किल्ल्यावरील विहिरीतील दीड-दोन फूट गाळ उपसा केला. त्यामुळे या विहिरीमध्ये चांगला पाणीसाठा निर्माण झाला. या व्यतिरिक्त किल्ल्यावरील धर्मशाळा, परिसर आणि गेली चार-पाच वर्षे बंद स्थितीमध्ये असलेला कोकण दरवाजा रस्त्याची साफसफाईही केली.

    गडावरील ठिकाणांची घेतली माहिती
    दोन दिवसांच्या रांगणा गडावरील वास्तव्यात हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी रांगणा गडावरील कोल्हापूर दरवाना, घोडेवाव विहीर, छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा, निवाळकरांचा वाडा, रांगणाई देवी मंदिर, मंदिराजवळील धर्मशाळा आणि विहीर, शिवकालीन तलाव, हत्तीची सोड माची, टकमक टोक, टेहळणी बुरूज, हनुमान मंदिर, श्री महादेवाची तीन मंदिरे (एकत्र दोन पिंडी असलेली), गणेश मंदिर, निळेली दरवाजा, पालो दरवाजा, षट्कोनी (तुपाची) विहीर, शिवकालीन भुयार, कोकण दरवाजा या महत्वपूर्ण ठिकाणांना भेटी देऊन तेथील स्थानिक माहितीदारांकडून सविस्तर माहिती घेतली.