श्रावणी सोमवार विशेष : तुंगारेश्‍वर पौराणिक, ऐतिहासिक, औषधी, प्राणी, पक्षी आणि निर्सग सौंदर्याचा तुंग पर्वत, जाणून घ्या स्पष्टपणे

महाशिवरात्रीला तर पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, रायगड लाखो भक्तांची रांग लागलेली असते.

  रविंद्र माने-वसई : संजीवनी बुटींचा द्रोणागिरी पर्वत उचलून नेत असताना हनुमानाच्या हातून द्रोणागिरीचा काही भाग ज्या ठिकाणी पडला तो तुंगारेश्‍वर पर्वत तुंग म्हणजे डोंगर आणि अर अरण्य अशा या पवर्तावर शंभु महादेवाचे मंदिर आहे. महादेवाचा भक्त असलेल्या विमलासुर राक्षसाने या ठिकाणी शंकराच्या पिंडीची स्थापना केली.

  मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चिंचोटी नाक्यानंतर उजवीकडे तुंगारेश्वर फाटा आहे. या ठिकाणी येण्यासाठी वसई रोड आणि नायगांव ही जवळची रेल्वे स्थानके आहेत. रेल्वे स्थानक पासून गोखिवरे सातिवली मार्गे ७ कि.मी.दूर असलेल्या तुंगार फाट्याला जाण्यासाठी ऑटरिक्षा, एसटी किंवा पालिकेच्या परिवहन सेवच्या बसेसमधून जाता येते. तिथून पुढे शंभु मंदिरात जाण्यासाठी ४ कि.मी.ची पायपीट करावी लागते. देवळापासून तुंगार डोंगराचा माथा भगवान परशुराम कुंडासह अनेक तीर्थ स्थाने आहेत. तुंगारेश्वर देऊळ डोंगराच्या पश्चिम बाजूच्या चढणीवर आणि बालयोगी श्री सदानंद महाराजांचे आश्रम पूर्व अंगास आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे २२०० मी उंचीवर परशुरामाचे कुंड आहे. येथील कड्याखालच्या कातळात पाण्याची ७ कुंडे आहेत. त्यापैकी एक खांबटाके आहे. त्यात छताला आधार देणारे ४ खांब आहेत.

  तुंगारच्या सर्वोच्च माथ्याहून उत्तरेस तानसा नदी आणि वायव्येस वैतरणा खाडी पाहता येते. विमलासुराच्या नेतृत्वाखाली असुरांनी ब्राह्मणांना त्रास देण्यास प्रारंभ केला. त्यामुळे कोप पावून परशुरामानं असुरांवर हल्ले चढवले अन् त्यांना पार समुद्रात ढकललं. विमल असुर मात्र परशुरामाच्या तावडीतून सुटला. त्याने तुंगार टेकडीवर आपलं वास्तव्य केलं. त्यानंतर विमलासुराने शंकराची आराधना करुन आपल्या तपश्चर्येने शंकराला प्रसन्न केले. ब्राह्मणांना त्रास न देण्याच्या आश्वासनावर मरणापासून त्याने मुक्तीही मिळवली. या टेकडीवर शिवलिंगाची प्रतिष्ठापना करून पवित्र कुंडाची निर्मिती त्याने केल्याचा उल्लेख अनेक ग्रंथात आढळतो. तुंगारेश्वराच्या माथ्यावर उत्तरेकडे पठार असून दक्षिणेकडे भला मोठा कडा आहे. पश्चिमेकडील वैतरणा पॉईंटला तुंगार टेकडीवरील सर्वांत उंच जागा मानण्यात येते. पॅनोरमा पॉईंट हून या कड्याचे भक्कम दर्शन घडतं. विमलासुराने स्थापन केलेल्या शंभुच्या पिंडीप्रमाणेच हा पर्वत, निसर्ग संपत्तीने संपन्न असा मानला जातो.

  इंद्रजीतचा बाण लागून घायाळ झालेल्या लक्ष्मणाला बरा करण्यासाठी द्रोणागिरी पर्वतावरून संजीवनी बुटी आणण्यास हनुमानाला सांगण्यात आले होते. मात्र संजीवनी न ओळखता आल्याने त्याने डोंगर उचलून नेला त्यावेळी या डोंगराचा काही भाग तुंगारेश्‍वर डोंगरावर पडला आणि द्रोणागिरी पर्वतावरील जडी-बुटी तुंगारेश्‍वरात उगवली असेही काही ग्रंथात लिहिले आहे. या डोंगरावर बालयोगी सदानंद महाराजांचे आश्रम आहे. या आश्रमात आयुर्वेदिक चहापासून अगदी कोरोनावर मात करणारी औषधीही उपलब्ध आहे. २००३ मध्ये हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. या अभयारण्यात पूर्वी मोठ्या संख्येने वन्य प्राणी व पक्षी होते. मात्र वनविभागाचे दुर्लक्ष झाल्याने जंगलपट्टा नष्ट होऊन वन्य प्राण्यांनी जीव वाचवण्यासाठी जंगल सोडले आहे.

  या अभयारण्यात मुरुड शेख, हरडा, सागवान, सावर, पळस, शिसव, बांबू, चिंच, खैर, अर्जुन, जांभुळ, बकुळी, राजन, काकड, मोह अशा विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, बिबट्या, तरस, रानडुक्कर, रानमांजर, भेकर, कोल्हा, ससे, घोरपड, लांडगे असे विविध वन्य प्राणी आणि पोपट, मोर, बगळा, घुबड, हळद्या, कोकिळा, पावशा, सर्प गरुड, महाभृंगराज, श्यामा, जंगली पिंगळा, सुभग, पर्ण पक्षी असे २५० हून अधिक प्रजातीचे पक्षी आहेत. या तुंगारेश्‍वरी भगवान परशुरामाचे ही वास्तव्य होते. या पर्वतावरून कोसळणार्‍या धबधब्यात तुडुंब भिजण्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात.

  पावसाळ्यातील विशेषतः श्रावणातील सहल मोठी पर्वणी ठरत असते. भगवंताच्या दर्शनासह पर्वतालगत असलेल्या नदी आणि ओढ्यात दिवसभर ठिय्या मांडण्याचा आनंदही पर्यटक घेत असतात. त्याहून अधिक भाविकांची या पर्वतावर गर्दी असते. महाशिवरात्रीला तर पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, रायगड लाखो भक्तांची रांग लागलेली असते. आदल्या दिवसापासून दर्शनासाठी रांग लावून भक्तगण रात्रभर रांगेत उभे असतात. श्रावणातही हिच परिस्थिती असते. दर सोमवारी हजारो भक्तगण या ठिकाणी येत असतात.

  यंदा तर अधिक महिना असल्यामुळे भाविकांची गर्दी वाढली आहे.त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी श्री तुंगारेश्वर महादेव मंदिर ट्रस्टने भक्त निवासाची सोय देवळाच्या बाजूबाजूला केली आहे.अल्पोपहार, चहापान आणि पुजेचे साहित्य मिळणारी दुकाने या ठिकाणी आहेत. प्यायच्या पाण्याची आणि स्वच्छता गृहाची व्यवस्था ट्रस्टमार्फत करण्यात आली आहे.