नवरात्र उत्सवासाठी श्री महालक्ष्मी मंदिर सज्ज; कडेकोट बंदोबस्तात असणार सीसीटीव्हीची नजर

महालक्ष्मी शारदीय नवरात्रौत्सव सोमवार दिनांक २६ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू होत असून मंदिरामध्ये सूर्योदयापूर्वी सकाळी ५.३० वाजता घटस्थापना होवून त्यानंतर ध्वजारोहण सकाळी ६.३० वाजता व आरती सकाळी ७.०० वाजता होईल . शुक्रवार दिनांक ३० सप्टेंबर २०२२ रोजी ललितापंचमी पूजन आहे.

    मुंबई : देश विदेशातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान व मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या महालक्ष्मी मंदिरात (Mahalaxmi Temple, Mumbai) नवरात्र उत्सवाची (Navratri Festival 2022) तयारी जोरदार सुरू असून नवरात्रीच्या दर दिवशी साधारणतः लाखो भाविक दर्शनासाठी येतात.

    ललिता पंचमी , अष्टमी व सुट्टीच्या दिवशी भाविकांची संख्या तीन लाखांपर्यंत जाते . वयस्कर , अपंग , गर्भवती स्त्रियांसाठी वेगळ्या रांगेची व्यवस्था केली आहे . तसेच VIP पास होल्डर या सर्वांना सुरक्षा रक्षक व्यवस्थेतूनच जावे लागणार आहे . भाविकांच्या सुरक्षेचा दृष्टीने सर्व प्रकारची तयारी मंदिर व्यवस्थापन व पोलिस प्रशासनाने केली आहे असे महालक्ष्मी मंदिराचे मुख्य व्यवस्थापक शरदचंद्र पाध्ये यांनी सांगितले आहे.

    महालक्ष्मी शारदीय नवरात्रौत्सव सोमवार दिनांक २६ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू होत असून मंदिरामध्ये सूर्योदयापूर्वी सकाळी ५.३० वाजता घटस्थापना होवून त्यानंतर ध्वजारोहण सकाळी ६.३० वाजता व आरती सकाळी ७.०० वाजता होईल . शुक्रवार दिनांक ३० सप्टेंबर २०२२ रोजी ललितापंचमी पूजन आहे. सोमवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी अश्विन शुद्ध अष्टमी असून अष्टमी हवनास १.३० वाजता प्रारंभ होवून पूर्णाहूती सायंकाळी ४.३० वाजता आणि त्या नंतर आरती होईल.

    बुधवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी विजयादशमी असून नवरात्रीत इतर दिवशी आरती सकाळी ७.०० वाजता , नैवेद्य साठी मंदिर सकाळी ११.४५ ते दुपारी १२.२० पर्यंत बंद राहील . संध्याकाळी ६.३० वाजता धुपारती आणि ७.३० वाजता मोठी आरती होईल . हे सर्व धार्मीक कार्यक्रम मंदिराचे मुख्य पुजारी प्रकाश साधले व सुयोग कुलकर्णी , अरुण वीरकर , रमाकांत भोळे , सुरेश जोशी. महेश काजरेकर , केतन सोहनी , गिरीश मुंडले यांच्यासह बावीस पुजाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली होईल.

    नवरात्र उत्सवात मंदिर सकाळी ५.०० वाजता उघडून रात्री १०.० वाजता बंद करण्यात येईल . देवळाच्या आवारात व हाजीअली पर्यंत च्या परिसरात ६२ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असुन मंदिरामध्ये पोलिस उपायुक्तयु व सहायक पोलिस आयुक्त नीलकंठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावदेवी पोलिस स्टेशन, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ताराम गिरप , इतर अधिकारी वर्ग , पोलिस कर्मचारी , ड्रॅगनचे संजय मोर्ये , राजू निकालजे , अजय सिंग यांच्या नेतृत्वाखाली पस्तीस सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

    पांडुरंग शेंडकर , राजेश पटेल , मनोहर शिंदे , दिगंबर शेंडकर , हेमंत नागपुरे , विजय भीमाने हे कर्मचारी आपल्या सहकाऱ्यांसह कार्यरत असतात. मंदिरात एक रुग्णवाहिका व सकाळ , संध्याकाळ १२ डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आली आहे असे शरदचंद्र पाध्ये यांनी व्यवस्थापनातर्फे सांगितले आहे.

    शरदचंद्र पाध्ये यांनी व्यवस्थापना तर्फे सांगितले की, पूजेचे साहित्य धातूच्या थाळी मध्ये न आणता प्लास्टिकची थाळी व छोट्या टोपल्याचां वापर करावा असे कळविले आहे . सोमवार ते शुक्रवार विनामूल्य दवाखाना असून अलोपॅथी आणि फक्त रविवारी आयुर्वेदिक औषधे दिली जातात.

    देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची रीघ चालू असून गावदेवी पोलिस ठाण्यातर्फे विशेष बंदोबस्त असतो . वाहतुकीची व्यवस्था ताडदेव वाहतूक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकारी शेख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ३० पोलिसांचा ताफा कार्यरत आहे . सुरक्षेच्या दृष्टीने भाविकांनी आपल्या बरोबर मोठ्या , जड बॅगा आणू नये असे आवाहन महालक्ष्मी मंदिर व गावदेवी पोलिस ठाणे यांच्यातर्फे केले आहे.