शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे अचानक समोरासमोर आणि…, वाचा नेमकं काय घडलं?

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी सोनई येथे गडाख आणि घुले पाटील यांच्या विवाह सोहळ्यास हजेरी लावली. यावेळी दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचारार्थ विवाहास उपस्थित विविध नेत्यांच्या, शिक्षक संस्था चालकांच्या तसेच मतदारांच्या भेटी घेतल्या.

    अहमदनगर – नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील (Nashik Padvidhar Election) चर्चेतील दोन्ही उमेदवार आज समोरासमोर आल्याचं बघायला मिळालं. विशेष म्हणजे या निवडणुकीवरुन महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे. ही निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. महाविकास आघाडीने ठाकरे गटाच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे त्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार असल्याचं स्पष्ट झालंय. दुसरीकडे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई करण्यात आली. त्यांना शिक्षक भारती संस्थेने पाठिंबा दिलाय. या निवडणुकीत शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे यांच्यात थेट लढत होतेय. त्यामुळे या निवडणुकीत कोण जिंकतं ते पाहणं महत्त्वाचं आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान दोन्ही उमेदवार आज समोरासमोर आल्याचं चित्र बघायला मिळालं.

    दोघांनीही एकमेकांकडे बघितल देखील नाही
    नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी सोनई येथे गडाख आणि घुले पाटील यांच्या विवाह सोहळ्यास हजेरी लावली. यावेळी दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचारार्थ विवाहास उपस्थित विविध नेत्यांच्या, शिक्षक संस्था चालकांच्या तसेच मतदारांच्या भेटी घेतल्या. सत्यजीत तांबे हे विवाह सोहळ्यातून बाहेर पडत‌ असताना तर शुभांगी पाटील विवाह सोहळ्याकडे प्रवेश करत असताना दोघेही समोरासमोर आले. मात्र दोघांनीही एकमेकांकडे बघितल देखील नाही. आजच्या शाही विवाहास दोन्ही उमेदवारांनी वधू-वरांना शुभ आर्शीवाद दिले. दुसरीकडे स्वत: च्या झोळीत मतांचं दानही टाकावं, अशी सादही दोन्ही उमेदवार मतदारांना घालताना दिसले.