सिद्धू मुसेवाला खूनप्रकणातील संशयित संतोष जाधव जेरबंद, गुजरातमधून ठोकल्या बेड्या

देशात सध्या गाजत असलेल्या लॉरेन्स बिष्णोई टोळीचे पाळेमुळे महाराष्ट्रात देखील असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. तर संतोष जाधव हा मंचर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार होता. त्याच्यावर खूनासह इतर गुन्हे दाखल असून, गुन्ह्यात मोक्का कारवाई केली होती. तो सव्वा वर्षापासून पुणे ग्रामीण पोलीसांना गुंगारा देत होता. त्याचदरम्यान, त्याचे नाव मुसावाला खूनात समोर आले.

  पुणे – पंजाबमधील गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येतील संशयित तसेच पुणे ग्रामीण पोलीसांकडून कडील मोक्काच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्या गुन्हेगार संतोष जाधवला जेरबंद करण्यात अखेर पोलीसांना यश आले आहे. तर, त्याला आसरा देणाऱ्या नवनाथ सूर्यवंशी यालाही पकडले आहे. दोघांना गुजरातमधील भुरुच मधून पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अटक केली. महांकाळच्या चौकशीतून या दोघांना अटक केली आहे, अशी माहिती अप्पर पोलिस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांच्यासह पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व अधिकारी उपस्थित होते.

  पंजाब पोलीसांनी सिद्धू मुसेवाला खूनप्रकरणात पुण्यातील दोघांचा संशयित म्हणून उल्लेख केल्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस खडबडून जागे झाले. त्यानंतर धावपळकरत पोलीसांनी सिद्धेश कांबळे उर्फ महांकाळ याला पकडले. त्यानंतर संतोष जाधवचा शोध सुरू केला होता. यादरम्यान, महांकाळकडून पोलीसांना त्याच्या बाबात माहिती मिळाली. त्यानंतर पोलीसांनी या परिसरात स्थानिक पोलीसांच्या मदतीने कारवाईकरून या दोघांना पकडले आहे. दरम्यान, तेजस शिंदे नावाचा तरूण संतोष जाधवसोबत पंजाब व हरियाणा येथे गेला होता. तो सध्या फरार असून, त्याचाही शोध घेतला जात आहे.

  देशात सध्या गाजत असलेल्या लॉरेन्स बिष्णोई टोळीचे पाळेमुळे महाराष्ट्रात देखील असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. तर संतोष जाधव हा मंचर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार होता. त्याच्यावर खूनासह इतर गुन्हे दाखल असून, गुन्ह्यात मोक्का कारवाई केली होती. तो सव्वा वर्षापासून पुणे ग्रामीण पोलीसांना गुंगारा देत होता. त्याचदरम्यान, त्याचे नाव मुसावाला खूनात समोर आले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. त्याच्यासोबत महांकाळचेही नाव आल्यानंतर त्याचा शोध लावण्यात यश आले. ग्रामीण पोलिसांची तीन ते चार पथके गुजरात, राजस्थान, दिल्ली, पंजाब येथे शोध घेत होते. संतोष गुजरात येथे असल्याचे समजता पोलीसांनी त्याला व त्याला आसरा देणाऱ्या नवनाथ सूर्यवंशीलाही अटक केली. नवनाथ याचे वडिल गुजरातमध्ये नोकरी करतात. त्यामुळे तो कुटूंबासोबत तिथेच राहतो. न्यायालयाने दोघांना २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

  पुणे ग्रामीण पोलीसांसोबतच इतर राज्यातील पोलीस देखील मुसेवाला हत्येच्या अनुषंगाने आरोपींचा शोध घेत आहेत. इतर राज्यातील तपास पथकांशी असलेल्या समन्वयातून महांकाळ, जाधव आणि सूर्यवंशीला अटक केली असल्याचे पोलीसांनी सांगितले. दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांचे एक पथक दिल्लीत ठाण मांडून असून लॉरेन्स बिष्णोईकडे चौकशी करणार आहेत.

  पंजाब आणि दिल्ली पोलिसांकडून चौकशी
  पुणे ग्रामीण पोलिसांनी महांकाळला पकडल्यानंतर त्याच्याकडे सखोल चौकशी केली जात आहे. त्यासोबतच दिल्ली आणि पंजाब पोलिसांनी देखील पुण्यात येऊन त्याच्याकडे चौकशी केली. लॉरेन्स गँग तसेच सलमान खान व इतर अनुषांगाने ही चौकशी केली केली जात आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि पंजाब पोलिसांच्या समन्वयातून हा तपास सध्या सुरू आहे.

  लारेन्स बिष्णोई टोळीचे पाळेमुळे देशभर
  लॉरेन्स बिष्णोई टोळीची पाळेमुळे देशभर पसरलेली असल्याचेही मुसेवाला खूनप्रकरणानंतर प्रकरशानाने समोर आली आहेत. गँगची आणखी सदस्य निष्पन्न होण्याची दाट शक्यता आहे. या टोळीत काम करण्यासाठी काहीजन संपर्कात देखील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, बिष्णोई गँगमध्ये नेण्याचे काम संतोष जाधवने केल्याचे समजते.

  सोशल मिडीयाच्या माध्यमातून गँग ऍक्टिव्ह
  बिष्णोई टोळी सोशल मिडियाच्या माध्यमातून ऍक्टिव्ह होती. फेसबुक कॉल, व्हाट्सअप कॉल, इन्स्ट्रा ग्राम कॉलच्या माध्यमातून त्यांचा एकमेकांशी संपर्क सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. महांकाळ याने इन्स्ट्राग्राम कॉलचा वापर केला आहे. त्यासोबतच सध्या नवीन आणि जुन्या गँग सोशल मिडीयाचा आधार तर घेत आहेतच पण, त्यामाध्यमातून संपर्क आणि दहशत देखील माजवित आहेत. त्यामुळे त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

  महांकाळ थेट गँगस्टर विक्रम बरारच्या संपर्कात
  लॉरेन्स बिष्णोई टोळीचा म्होरक्या गँगस्टर विक्रम बरार हा कॅनडात आहे. तो सध्या ही गँग चालवत असल्याचे बोलले जाते. महांकाळ हा विक्रम बरारच्या संपर्कात होता. संतोष जाधवची देखील लिंक बिष्णोई गँगशी असल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आली आहे. महांकाळ हा संतोषच्या संपर्कात होता. तो संतोष सोबत पंजाबला गेला होता. महांकाळचा विक्रम बरारशी संपर्क झाला होता तो संपर्क संतोष जाधव मार्फत झाला होता. महांकाळ चार ते पाच राज्यात फिरला आहे. महांकाळनेने बिष्णोई गॅंगचे टार्गेट हेरण्यासाठी पंजाब आणि हरियाणा येथे रेकी केली होती.

  भाईजानच्या धमकीची महांकाळला माहिती
  महांकाळला सलमान खानाला धमकी दिली जाणार आहे याची माहिती होती. परंतु त्याला सलमानला पाठविण्यात आलेल्या धमकीच्या पत्राबाबत काहीही माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सलमानच्या अनुषंगाने महांकाळ कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिल्ली हरियाणा येथे तपास सुरू आहे.

  जाधवचे वेषांतर
  सोशल मिडीया तसेच माध्यमातून संतोष जाधवचे नाव समोर आल्यानंतर संतोष जाधवने पोलीसांपासून वाचण्यासाठी वेषांतर केले होते. त्याचे केस कुरळ्या पद्धतीने आहेत. त्याचे फोटोही समोर आले होते. त्यानंतर त्याने केस कापून टक्कल केले व आपली ओळख लपविण्याचा प्रयत्न केला.