डोंबिवली एमआयडीसी परिसरात नागरिकांची रस्त्यांसाठी मूक निदर्शने, एमआयडीसी प्रशासनाचा नोंदवला निषेध

नागरिकांनी डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील सर्व रस्ते कॉंक्रिटीकरण होणार असल्याचे सांगण्यात आले होते. तीस वर्षानंतर रस्त्यांचे काँक्रीटकरण होणार ही चांगली बाब आहे.

    कल्याण : डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील सर्व रस्ते काँक्रिटीकरण करण्यात येणार होते. मात्र यामधील मॉडेल कॉलेजसह काही परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आज नागरिकांनी हातात निषेधाचे फलक व तोंडाला मास्क लावून या परिसरातील रस्त्यांवर एमआयडीसी विरोधात मूक निदर्शने केली.
    यावेळी नागरिकांनी डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील सर्व रस्ते कॉंक्रिटीकरण होणार असल्याचे सांगण्यात आले होते. तीस वर्षानंतर रस्त्यांचे काँक्रीटकरण होणार ही चांगली बाब आहे. प्रत्यक्षात मात्र एमआयडीसीतील महत्त्वाच्या मॉडेल कॉलेज परिसरातील काही अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणार नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही अंतर्गत रस्ते महत्त्वाचे नसतानाही व त्यावर जास्त रहदारी नसतानाही त्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. मग मॉडेल कॉलेज अंतर्गत रस्त्यांसह शिवाई बालक मंदिर शाळे समोरील रस्ता व चैतन्यनगर, मिलापनगर, सुदर्शननगर मधील काही अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण का करणार नाही असा सवाल देखील नागरिकांनी केला आहे. आम्ही टॅक्स भरतोय तरीही आमच्यावर अन्याय का? या रस्त्यांचे काँक्रिटीकरण झालच पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.