
उल्हासनगर कॅम्प 5 येथील नेताजी चौकात उल्हासनगर जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना “एक शेर को मारने के लिए 100 सिंधी कुत्ते भी कुछ नही कर सकते”,असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
ठाणे: सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा ठाण्यातील सिंधी समाजाने निषेध केला आहे. सिंधी समाजाच्या (Sindhu Community Protest In Thane) वतीने आज ठाण्यातील (पूर्व) कोपरी भागामध्ये बंद (Kopri Bandh) पुकारण्यात आला आहे. या बंद मध्ये सगळ्याच समाजाच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे.
जितेंद्र आव्हाडांचं आक्षेपार्ह वक्तव्य
उल्हासनगर कॅम्प 5 येथील नेताजी चौकात उल्हासनगर जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना “एक शेर को मारने के लिए 100 सिंधी कुत्ते भी कुछ नही कर सकते”,असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर उल्हासनगर तसेच ठाण्यातील सिंधी बांधवांनी निषेध सुरूच ठेवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 27 मे रोजी जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगरमध्ये आक्षेपार्ह विधान केलं होतं.
उल्हासनगरमध्ये गुन्हा दाखल
सिंधी समाजाबद्दलच्या वक्तव्याविरोधात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधी समाजाबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेपार्ह विधान केल्याची तक्रार भाजप जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वामी यांनी तीन-चार दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतर उल्हासनगर हील लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माफी मागेपर्यंत निषेध कायम
जोपर्यंत जितेंद्र आव्हाड माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्या घरावर मोर्चा काढणे, कोपरी बंद ठेवणे, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देणे, या संविधानिक मार्गाने निषेध नोंदवण्याचा निर्णय सिंधी समाजाने घेतला आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह कोपरीमधील सिंधी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. आता जितेंद्र आव्हाड या प्रकरणात माफी मागणार का? पोलीस त्यांच्यावर काही कारवाई करणार का? असे प्रश्न सध्या विचारले जात आहेत. आजपर्यंत अनेकदा जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे ते अनेकदा अडचणीत आले आहेत. यावेळीही त्याचीच पुनरावृत्ती झाल्याचं दिसत आहे.