Sinhagad police seize arms cache
Sinhagad police seize arms cache

  पुणे : सिंहगड रोड पोलिसांनी सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराच्या मुसक्या आवळत मोठा शस्त्रसाठा पकडला आहे. कारवाईत एकाचवेळी तब्बल चार पिस्तुले आणि आठ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्यांनी हा शस्त्रसाठा कोठून आणला व कशासाठी आणला, याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

  सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  सिद्धेश संतोष पाटील (वय २८, रा. वडगाव बुद्रुक), विकास सुभाष सावंत (वय २६) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सचिन निकम, पथकातील अंमलदार देवा चव्हाण, सागर शेडगे व त्यांच्या पथकाने केली आहे.

  पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली

  सिंहगड रोड पोलिसांचे तपास पथक रेकॉर्डवरील गुन्हेगार, संशयित आरोपी तसेच पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा पोलीस अंमलदार देवा चव्हाण व सागर शेडगे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार सिद्धेश पाटील आणि त्याचा मित्र विकास यांच्याकडे गावठी पिस्तूल आहेत. ते हिंगणे खुर्द परिसरातील कॅनोर रोडला बसलेले आहेत. त्यानुसार लागलीच या भागात सापळा रचला. परंतु, दोघांना पोलिसांची चाहूल लागताच दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने या दोघांना काही अंतरावर पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर दोघांकडे चार गावठी पिस्तूल व ८ जिवंत काडतूसे मिळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, त्यांच्यावर गुन्हा नोंदकरून अटक करण्यात आली आहे.

  एका गुन्हेगारी टोळीशी संबंधित असल्याची माहिती समोर

  दरम्यान, सिद्धेश हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. खून तसेच इतर गुन्हे दाखल आहेत. तर, विकास हा त्याचा मित्र आहे. तो मूळचा बीड जिल्ह्यातील आहे. या दोघांनी हे पिस्तूल कोठून आणले आहेत. तसेच, ते या पिस्तूलांची कोणाला विक्री करणार होते की, त्या पिस्तूलातून गुन्हा करणार होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मात्र, सिद्धेश हा एका गुन्हेगारी टोळीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली असून, त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.