Sixteen thousand cases pending in Pune city; Police Commissioner's order to dispose of crimes immediately

  पुणे : शहर आयुक्तालयातील ३२ पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल १६ हजार गुन्हे तपासावर प्रलंबित असल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये अनेक महिन्यांपासून काही गुन्हे प्रलंबित असल्याचेही निदर्शनास आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे प्रलंबित गुन्हे तत्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यासोबत यापुढे ३ महिन्यांच्या पुढे कोणताही गुन्हा तपासावर प्रलंबित न ठेवण्याचे आदेशदेखील दिले आहेत.

  सद्यःस्थिती ३२ पोलीस ठाणी

  पुण्याचा विस्तार वाढला आहे. त्याप्रमाणात गुन्हेगारीदेखील वाढली आहे. शहर पोलीस आयुक्तालयात सद्यःस्थिती ३२ पोलीस ठाणी आहेत. वर्षाला जवळपास १३ हजारांहून अधिक गुन्हे दाखल होतात. दरम्यान, लोकसंख्या व गुन्ह्यांची आकडेवारी पाहता पोलिसांवर ताण असल्याचे दिसते. एकीकडे गुन्ह्यांची संख्या वर्षाला वाढत आहेतच, पण त्याप्रमाणाने कामकाज स्मार्ट होत नसल्याचे वास्तव आहे. गुन्ह्यांसोबतच तक्रार अर्जांची संख्या देखील हजारांवर आहे. त्यातील अनेक अर्ज पेडींग राहतात.

  दरम्यान, शरीराविरुद्धच्या गुन्ह्यात तत्काळ गुन्हा नोंदविला जातो. परंतु, आर्थिक फसवणूक व इतर प्रकरणात तक्रार येते. या तक्रारीची चौकशीकरून गुन्हा नोंद केला जातो. तत्पुर्वी एखादा गुन्हा नोंद केल्यानंतर ठरावीक कालावधीत त्याचा तपासही पूर्ण करावा लागतो. मात्र, काही गुन्हे महिनोंमहिने तपास सुरूच राहत असल्याचे दिसत आहे.

  तब्बल १६ हजार गुन्हे तपासावर प्रलंबित

  गुन्हे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढत आहे. या सर्व बाबींचा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुन्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर तब्बल १६ हजार गुन्हे तपासावर प्रलंबित असल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये काही वर्षांपासून देखील गुन्हे प्रलंबित असल्याचे दिसून आले आहे.  ते गुन्हे आता तत्काळ तपासावर निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहे.

  तीन महिन्यांच्या पुढे तपास नको…
  पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भाग एक ते पाचमधील गुन्ह्यांचा आढावा घेतला आहे. त्यामध्ये गुन्हे प्रलंबित असल्याचे समोर आले. यानंतर पोलीस आयुक्तांनी कोणताही गुन्हा तीन महिन्यांच्या पुढे तपासावर न ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच, तीन महिन्यांच्या आत तपास पुर्ण करावा असे म्हंटले आहे.

  पोलीस उपायुक्तांवर जबाबदारी…
  तपासावर प्रलंबित असलेल्या १६ हजार गुन्हे तत्काळ तपास पुर्णकरून निकाली काढले जाणार आहेत. त्याची जबाबदारी संबंधित परिमंडळांच्या पोलीस उपायुक्तांवर देण्यात आली आहे. ते दररोज एका पोलीस ठाण्यात दहा ते दुपारी दोन यावेळेत स्वत: थांबून तक्रारदारांशी संवाद साधणार आहेत. तसेच, त्या गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.