सोगलगड जंगलात आढळला मानवी हाडांचा सांगाडा; पोलिस दलात खळबळ

गावकरयांच्या मदतीने मृताची ओळख पटविली असून तो मानवी सांगाडा सेलडोह येथील अशोक दौलत उईके (वय ५५, राहणार सेलडोह) याचा असल्याचे त्याच्या पत्नी व मुलाने सांगितले. सिंदी (रेल्वे) नजीकच्या सेलडोह गावाजवळ असलेल्या सोमलगड जंगलात मानवी सांगाडा विखुरलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

    वर्धा (Wardha ) :  वर्धा-नागपूर सीमेवर असलेल्या सोमलगड बीट क्र.२५५ मध्ये असलेल्या परिसरात वन विभागाला गस्तीदरम्यान मानवी अवयव आढळून आले. याप्रकरणी सिंदी पोलिसांनी सेलडोह येथील गावकरयांच्या मदतीने मृताची ओळख पटविली असून तो मानवी सांगाडा सेलडोह येथील अशोक दौलत उईके (वय ५५, राहणार सेलडोह) याचा असल्याचे त्याच्या पत्नी व मुलाने सांगितले. सिंदी (रेल्वे) नजीकच्या सेलडोह गावाजवळ असलेल्या सोमलगड जंगलात मानवी सांगाडा विखुरलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

    वनकर्मचार्यांनी केळझरचे वनपाल नंदकिशोर पाचपोर याना घटनेची माहिती दिल्यानंतर सिंदी (रे) पोलिसांना माहिती देण्यात आली. मृत अशोक उईकेची सोमलगड जंगलालगत शेती असल्याने तो शेतातील झोपडीतच राहत होता. पंधरा- पंधरा दिवस तो घरी येत नसल्याने कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली नसल्याचे सांगितले. अशोक हा शेतात असलेल्या झोपडीत व अनेकदा शेतातील झाडाखाली जंगलात दरी करुन राहायचा.

    दरम्यान, वनविभागातील कर्मचाऱ्यांना गस्तीदरम्यान दुर्गंधी येत असल्याने जाऊन पाहिले असता विखुरलेले मानवी शरिराचे अवयव आढळून आले. दोन वर्षांपूर्वी अशोकचा पाय मोडला होता. त्यामुळे त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करून रॉड टाकण्यात आला होता. मृताच्या संगाड्याजवळ लोखंडी रॉड व नटबोल्ट आढळल्याने त्याच्या पत्नी व मुलाने हा अशोक उइकेचा मृतदेह असल्याचे पोलिसांना सांगितले. अशोकच्या पश्चात पत्नी व दोन विवाहित मुले आहेत. ठाणेदार चंद्रशेखर चकाटे, पोलीस उपनिरीक्षक जयेंद्र नगराळे, दिलीप कडू, बळवंत पिंपळकर, संदीप सोयाम आदींनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.