slab collapsed in kalyan

सुर्यानगर लोकवस्तीच्या जवळपासच दगडी खाण असल्याने अनेकांच्या घरांना हादरे बसतात, असे बोलले जाते. खडी मशीन व खाणीमध्ये होणाऱ्या विस्फोटामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे तात्काळ खाणीवर कल्याण तहसिलदार व म्हारळ गाव प्रशासनाने बंदी आणावी, अशी मागणी स्थानिकामध्ये जोर धरू पाहत आहे.

    कल्याण : कल्याणनजीक (Kalyan) म्हारळ (Mharal) गावातील सूर्यानगर परिसरात घरांच्या छताच्या स्लॅबचे आच्छादन (Slab Collapsed In Mharal)कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू तर एक मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहेत.

    म्हारळ गावाजवळ मोठ्या प्रमाणात दगड खाणी आहेत. गौण खनिज संपदा मिळत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात खाणी आहेत. या खाणीचे मालक दुपारी तसेच रात्रीच्या वेळी स्फोट घडवून आणतात. त्यामुळे म्हारळ गाव तसेच उल्हासनगरमधील हनुमान नगर मधील घरांना तडे जाणे, पत्र्यावर दगड पडल्याने पत्रे तुटण्याच्या घटना वरचेवर घडत असतात. म्हारळचा आदिवासी पाडा हा तर या खाणीमुळे विस्थापित होण्याच्या मार्गावर आहे.

    म्हारळ गावात सुर्यानगर ही चाळीची वस्ती आहे. या चाळीत रंजना कांबळे या दोन मुली व एक मुलगा यांच्यासह राहत होत्या. एक वर्षापूर्वी त्यांचे पती उमाजी कांबळे यांचे निधन झाले आहे. रंजना मोलमजुरी, धुणी भांडी करुन मुलीचे शिक्षण व पालन पोषण करीत होत्या. पहाटे तीन ते सव्वातीनच्या सुमारास अचानक घराचा स्लॅब कोसळला. यामध्ये गाढ झोपेत असलेल्या रंजना कांबळे वय (३८) वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगी प्रज्ञा वय (१८) वर्षे ही गंभीर जखमी झाली आहे. तिला मुंबई सायन येथे उपचारांसाठी हलविण्यात आले आहे . सुदैवाने मुलगा राज वय (१६) वर्षे व मोठी मुलगी प्रिती वय (२०) वर्षे हे बाजूला झोपायला गेल्याने वाचले.

    सुर्यानगर लोकवस्तीच्या जवळपासच दगडी खाण असल्याने अनेकांच्या घरांना हादरे बसतात, असे बोलले जाते. खडी मशीन व खाणीमध्ये होणाऱ्या विस्फोटामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे तात्काळ खाणीवर कल्याण तहसिलदार व म्हारळ गाव प्रशासनाने बंदी आणावी, अशी मागणी स्थानिकामध्ये यानिमित्ताने जोर धरू पाहत आहे. एक वर्षापूर्वी पित्यांचे छत्र हरपले आणि आता आईचा दुर्घटनेत मुत्यू झाल्याने प्रिती, प्रज्ञा,राज यांचा मातृत्वाचा आधार हरपल्याने अनाथ झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.