बारामतीत राजकीय गदारोळ! अजित पवार यांच्या फॉर्म हाऊस बाहेर सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर शाईफेक

बारामतीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर शाईफेक करण्यात आली आहे.

    बारामती : बारामतीमध्ये (Baramati) आगामी निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादी पक्षामध्ये (NCP) फूट पडल्यानंतर दोन्ही गटाकडून बारामतीचा गड आपल्याकडे राखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी आगामी लोकसभा निवडणूकीसाठी (Lok Sabha elections) सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या नावाची चर्चा होत असताना, बारामतीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर शाईफेक करण्यात आली आहे. संबंधित प्रकार बारामतीमध्ये घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

    बारामतीमध्ये संबंधित घटना काल रात्री घडली आहे. अजित पवार यांचे कऱ्हाटी गावात फार्म हाऊस आहे. याच फार्म हाऊसच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांचं बॅनर लावलं होतं. पण अंधाराचा फायदा घेऊन या बॅनरवर शाईफेक करण्यात आली. अज्ञात आरोपींकडून ही शाईफेक करण्यात आली असून यानंतर त्यांनी पळ काढला आहे. ही शाईफेक नेमकी कुणी केली? याची चर्चा सर्वत्र बारामतीमध्ये होत आहे. बारामती पोलीसांनी यांची गांभीर्याने दखल घेतली असून या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

    पोलिसांनी संबंधित बॅनर हटवला

    सुनेत्रा पवार यांच्या बॅनर्सवर शाहीफेक झाल्यानंतर याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी तऱ्हाटी गावातून संबंधित बॅनर काढला आहे. या घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांना देखील माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असून त्या म्हणाल्या, कोणत्याही नेत्याचं बॅनर असलं तरी त्यावर शाईफेक करणं हे दुर्देवी आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी व्हायला पाहिजे, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.