आधी इराण, आता तैवानमध्ये कबड्डी वाढतेय हा वेगळा आनंद : स्नेहल शिंदे

  पुणे : आशियाई कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याचा आनंद आहेच. पण कबड्डी परदेशातही चांगलीच फोफावत असल्याचा आनंद अधिक आहे, अशी प्रतिक्रिया सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघातील खेळाडू स्नेहल शिंदे हिने व्यक्त केली.

  गोल्डमेडलिस्ट स्नेहल बुधवारी पुण्यात परतली

  आशियाई स्पर्धेतील सुवर्णयशानंतर स्नेहल बुधवारी पुण्यात परतली. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरापासून स्नेहलच्या माहेरच्या घरापर्यंत म्हणजे खडक पोलिस लाईनपर्यंत उघड्या जीपमधून स्नेहलची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीला पुणेकरांनी उस्फूर्त दाद दिली. आपली मुलगी सुवर्णपदक जिंकून परतलीये, त्यामुळे जरा थांबून तिचे स्वागत केले, अभिनंदन केले तर बिघडले कुठे असे म्हणत पुणेकरांनी रस्त्यात थांबून स्नेहलचे स्वागत केले.

  मिरवणुकीची सांगता झाली तेव्हा तिच्या जिजामाता शाळेच्या मुलींबरोबर जल्लोषात सहभागी होत स्नेहलने डान्सही केला. संपूर्ण मिरवणुकीत नवरा सागर साखरे, सासू स्वाती साखरे, मामा अजय चिंचवडे, किरणी पाटील, भाऊ निखिल शिंदे, वडिल प्रदीप शिंदे, आई सुरेखा शिंगे, पूनम शिंदे, भाऊ पृथ्वीराज चिंचवडे, केश पाटील, अजय शिंदे असे सर्व कुटुंबिय उपस्थित होते.

  सांगता झाल्यानंतर स्नेहलशी संवाद
  मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर स्नेहलशी संवाद साधला असता, तिने आशियाई स्पर्धेत भारताकडून खेळण्याचे स्वप्न बाळगले होते. इंडोनेशियात  ते पूर्ण होऊ शकले नाही, पण या वेळी ते साकार झाल्यावर सुवर्णपदक घेऊनच मायदेशी यायचे ही खूणगाठ मनाशी बांधली होती. ती इच्छा पूर्ण झाली. आम्ही सुवर्णपदक मिळविले खूप आनंद वाटला. देशाच्या राष्ट्रगीताची धून वाजण्यात आपण कारणीभूत ठरलो याचा विजयमंचावर उभे राहिल्यावर अभिमान वाटला, असे स्नेहल म्हणाली.

  इराण आणि आता तैवान संघ पूर्ण तयारीने उतरले

  कबड्डीत खरे तर भारताला आव्हान नाही इतकी आपली मक्तेदारी होती ती परत मिळवायला आवडेल. पण, आधी इराण आणि आता तैवान संघ पूर्ण तयारीने उतरले होते. त्यांची तयारी चांगली होती. त्यामुळे सुवर्णपदकाबरोबर कबड्डी परदेशात चांगली फोफावत असल्याचे पाहून आनंद द्विगुणित झाला, असेही स्नेहलने सांगितले.

  एकाच घरात दुसरे पदक
  स्नेहल भारताची यापूर्वीची आशियाई आणि जागतिक कबड्डी विजेत्या संघातील खेळाडू किशोरी शिंदेची बहिण आहे. एकाच घरात दुसरे आशियाई सुवर्णपदक आले आहे. याविषयी ती म्हणाली, ‘किशोरीनेच मला कबड्डीच्या मैदानावर आणले. तिला घडताना, तयारी करताना पाहून मी मैदानात उतरले आणि तिच्या पाठोपाठ तिचाच आदर्श ठेवत राष्ट्रीय संघात स्थान मिळविले.’