सातारा जिल्ह्यातील तब्बल ‘एवढा’ ऊस शिल्लक; कारखाने बंद झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी गाळप हंगामाची सांगता केली असली तरी अजून वाईसह जावळी, खंडाळा तालुक्यांतील २० हजारांवर टन ऊस गाळपाविना उभ्याचं अवस्थेत आहे. एकूण परिस्थिती बघता हा ऊस तुटणार नसल्याने शेतकऱ्यांना लाखोंचे नुकसान सहन करावे लागणार आहे.

  सातारा : जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी गाळप हंगामाची सांगता केली असली तरी अजून वाईसह जावळी, खंडाळा तालुक्यांतील २० हजारांवर टन ऊस गाळपाविना उभ्याचं अवस्थेत आहे. एकूण परिस्थिती बघता हा ऊस तुटणार नसल्याने शेतकऱ्यांना लाखोंचे नुकसान सहन करावे लागणार आहे.

  दरम्यान सातारा जिल्ह्यात १४ साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता झाली आहे. अजिंक्यतारा कारखाना वगळता इतर सर्व कारखान्यांनी मे महिन्यांच्या सुरुवातीला हंगामाची सांगता केली. अजिंक्यतारा कारखान्याने ३ जूनअखेर गाळप केले. सर्व कारखान्यांनी या हंगामात एक कोटी २५ लाख टनांवर साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा ऊस गाळपाच्या इतिहासात रेकॅार्ड ब्रेक साखरनिर्मिती झाली आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला अद्यापही २० हजार टन ऊस शिल्लक राहिला आहे.

  ऊस उभा असतानाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत जिल्ह्यातील कारखाने बंद झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. किसन वीर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस ‘जरंडेश्वर’ व ‘अजिंक्यतारा’ या कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात नेत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यांचेही प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. तरीही अजून २० हजार टन ऊस शिल्लक आहे.

  पुणे जिल्ह्यातील राजगड कारखान्याला ऊस गाळपास नेला जात आहे. मात्र, या कारखान्यांची क्षमता कमी असल्याने ऊस शिल्लक राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यात आले असताना शिल्लक ऊस तोडण्यासाठी यंत्रणा कार्यरत ठेवण्यास सांगितले होते. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनीही सर्व ऊस तुटल्याशिवाय कारखाने बंद न करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

  मात्र, या सूचना कारखान्यांनी गांभीर्याने न घेताच हंगाम संपवला आहेत. मंत्र्यांसह अधिकाऱ्यांनी ऊस उत्पादकांना वाऱ्यावर सोडल्याने लाखोंचे नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे. सातारा जिल्ह्यात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे दोन मंत्री असतानाही जिल्ह्यात शिल्लक उसाचे नियोजन केले गेले नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे.

  दरम्यान किसन वीर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उसाचे नियोजन अगोदर करणे गरजेचे होते. कार्यक्षेत्रातील शिल्लक उसाबाबत कसलाही विचार न करता जिल्ह्यातील कारखान्यांनी हंगामाची सांगता केली. त्यामुळे शिल्लक राहणाऱ्या उसाची जबाबदारी दोन्ही मंत्र्यांसह सर्वांनीच झटकली असल्याचे स्पष्ट होत आहे.