सामाजिक कृतज्ञता पुरस्कार डॉ दत्तप्रसाद दाभोळकर यांना प्रदान 

जागतिकीकरणाच्या या युगात सरकारी नोकरीच्या संधी कमी होत असताना तरुणांनी विज्ञाननिष्ठ बनल्यास त्यांना स्वयंरोजगाराची दळणे खुली होतील असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांनी सातारा येथे बोलताना केले. 

    सातारा : “जागतिकीकरणाच्या या युगात सरकारी नोकरीच्या संधी कमी होत असताना तरुणांनी विज्ञाननिष्ठ बनल्यास त्यांना स्वयंरोजगाराची दळणे खुली होतील”, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांनी सातारा येथे बोलताना केले.

    सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय सातारच्या वर्धापन दिन समारंभ निमित्त आयोजित  रावबहादूर संभाजीराव मोरे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार व मानपत्र वितरण समारंभात सत्काराला उत्तर देताना डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ विचारवंत प्रा डॉ आ.ह. साळुंखे होते. डॉ आ.ह. साळुंखे यांच्या हस्ते हा पुरस्कार दाभोलकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन जयेंद्रदादा चव्हाण व प्राचार्य डॉ. दिलीप गायकवाड उपस्थित होते. यावेळी विचारपिठावर संस्थेचे सचिव मिलिंद घाडगे , खजिनदार आनंद कदम , एडवोकेट सचिन नलावडे निलेश दुदुस्कर उपस्थित होते.

    डॉ दत्तप्रसाद दाभोळकर पुढे म्हणाले की, विज्ञान माणसाला त्याच्या जीवनातील अनेक समस्यांचे उत्तर देत असते. घडणाऱ्या अनेक गोष्टींचा वैज्ञानिक दृष्टीने व संशोधक वृत्तीने अभ्यास केल्यास अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. ज्यामुळे आर्थिक आणि सामाजिक उन्नती होते. यासाठी तरुणांनी आपली मानसिकता बदलून शिक्षण , संगणक आणि तंत्रज्ञान अवगत करणे आवश्यक आहे.

    अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ आ.ह. साळुंखे म्हणाले की, हा पुरस्कार डॉ दाभोळकर यांनी केलेल्या वैज्ञानिक , साहित्यिक व सामाजिक कार्यासाठी त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. शिक्षणाने जीवन समृद्ध होते. सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले या फुले दांपत्यांनी शिक्षण बहुजन समाजाच्या दाराशी आणले. नव्या पिढीने शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्या माध्यमातून नवा समाज घडवावा.

    जयेंद्र चव्हाण म्हणाले की, डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या साहित्य आणि संशोधनांमधून सम्राट समाज समृद्ध होत गेला त्यांच्या विचारांनी अनेक विचारवंत घडविले आहेत त्यामुळे त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव हा या पुरस्काराच्या माध्यमातून केला गेला आहे. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्यावरील ओवी ने झाली. प्रास्ताविक प्राचार्य डॉ दिलीप गायकवाड यांनी केले. आभार नवनीता पटेल दुदुस्कर यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा उदय लोखंडे यांनी केले. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी , प्राध्यापक , विद्यार्थी व जेष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जयंत दादा चव्हाण यांच्या जन्मदिनानिमित्ताने कोरोना महामारी काळात कोरोनाग्रस्त लोकांना मदत करणाऱ्या कोरोना योद्धांचाही सत्कार डॉ दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. विशेष म्हणजे शेंद्रे येथील एहसास मतिमंद विद्यालयात फळ वाटप कार्यक्रमही झाला.