सोलापूरची माती जाणार दिल्लीला; झेडपीचा ‘आझादी का अमृत’ महोत्सवांतर्गत उपक्रम

'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत 'मेरी माटी, मेरा देश' या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील एक हजार २५ ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी (दि. २६) अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमातून जमा केलेली जिल्ह्यातील माती दिल्लीला पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी दिली. 

    सोलापूर : ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘मेरी माटी, मेरा देश’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील एक हजार २५ ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी (दि. २६) अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमातून जमा केलेली जिल्ह्यातील माती दिल्लीला पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी दिली.

    माझी वसुंधरा अभियान, आझादी का अमृत महोत्सव, मेरी माटी मेरा देश, स्वच्छता या सेवा उपक्रमांची अंमलबजावणी अमृतकलश यात्रेत करण्यात येणार आहे. अमृतकलश यात्रेतून जिल्ह्यातील 1 हजार 25 ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता संदेश, घोषवाक्ये, जलप्रदूषण, ओला व सुका कचऱ्यासाठी कचराकुंडी ठेवणे, अमृत कलशसाठी प्रत्येक घरातून माती संकलन करणे, पंचप्राण शपथ, स्वच्छता शपथ, माझी वसुंधरा शपथ, कचरा गोळा करणे, असे विविध उपक्रम राबवून कलश मिरवणूक काढण्यात येणार आहे. या कलशमधून प्रत्येक गावातील माती जिल्हास्तरावर संकलित केली जाणार आहे. ही माती एकत्रित करून एका कलशमध्ये भरून मंत्रालयात पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर मंत्रालयातून ही माती दिल्लीला पाठवली जाणार आहे.

    दिल्ली येथे उभारण्यात येणाऱ्या अमृत कलशमध्ये ही माती मिसळली जाणार आहे. या उपक्रमासाठी केंद्र शासनाने देशभरातील प्रत्येक गावातून माती संकलन करण्याचे काम सुरू केले आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावातील माती मिसळली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत कलशची मोहीम वेगाने सुरू आहे. यासाठी गाव तालुका व जिल्हास्तरावर कामाचे नियोजन करण्यात आले आहे. मेरी माटी मेरा देश या उपक्रमाअंतर्गत अमृत कलशसाठी माती संकलन करण्याचे नियोजन वेगळ्या पद्धतीने करण्यात आले आहे.

    माझी वसुंधराला गती…

    माझी वसुंधरा उपक्रमात दक्षिण सोलापुरातील मंद्रूप ग्रामपंचायतीने सलग दोन वर्ष कोटीचे बक्षीस मिळवले आहे. जिल्ह्यात यंदाही या स्पर्धेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सुमारे 25 ग्रामपंचायतीने या स्पर्धेत भाग घेतला आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांनी दिली.