सोलापूरचा भाजप उमेदवार ठरला; पाचव्या यादीत राम सातपुतेंना उमेदवारी

सोलापूर लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी भाजपचा उमेदवार कोण, याची उत्सुकता अखेर संपली असून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी मिळाली आहे.

    सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी भाजपचा उमेदवार कोण, याची उत्सुकता अखेर संपली असून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्या रूपाने भाजपकडून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना तगडे आव्हान देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. सोलापुरात भाजपच्या उमेदवारीसाठी मोठी गर्दी झाली होती. परंतु यात अखेर आमदार राम सातपुते यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे.

    राम सातपुते हे मतदार संघात गावोगावी फिरून नागरिकांचे प्रश्न जाणून ते सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न करत असतात. जरी ते इतर जिल्ह्यातले असले तरी मागील पाच वर्षात त्यांनी सोलापूर जिल्ह्यात आपली चांगली ओळख निर्माण केली आहे. आता भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाल्यावर निश्चितच आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते यांच्यातील लढत तितक्याच ताकदीची पाहायला मिळेल.

    भाजपकडून सोलापूर लोकसभेसाठी आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर होताच सोलापुरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली.