प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमात सोलापूर जिल्हा राज्यात तिसरा

पुणे येथे यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी, (यशदा) येथील सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागातील जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी व निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) यांची आढावा सभा आयोजित केलेली होती.

    सोलापूर : पुणे येथे यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी, (यशदा) येथील सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागातील जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी व निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) यांची आढावा सभा आयोजित केलेली होती.

    सदर सभेस आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील तसेच ऑनलाइन व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग डॉ. प्रदीप व्यास व आयुक्त राष्ट्रीय आरोग्य अभियान एन. रामास्वामी हे उपस्थित होते. या आढावा सभेमध्ये सन 2021- 2022 या आर्थिक वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. या वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्याने प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमामध्ये राज्यामध्ये तिसरा क्रमांक पटकावला असून जिल्ह्यात कोव्हिड-19 संसर्ग मोठ्या प्रमाणावर असतानाही माता व बालकांना वेळीच आरोग्य सेवा देण्यामध्ये जिल्ह्याचा आरोग्य विभाग यशस्वी ठरला आहे.

    सोलापूर जिल्हा भौगोलिक दृष्ट्या व लोकसंख्येने पहिल्या दोन क्रमांकाच्या जिल्ह्यांच्या मानाने अतिशय मोठा असतानाही व आरोग्य यंत्रणेमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त असतानाही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह आरोग्य विभागाच्या टीमने नियोजनबद्ध कार्यक्रम राबवून हे यश संपादन केले आहे.

    जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल कुमार जाधव आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ज्यामध्ये जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा निवासी बाह्य संपर्क अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांच्या समन्वयाने तालुक्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक व आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका यासह इतर विभागाचाही सहभाग घेऊन दर्जेदार आरोग्य सेवा देण्यामध्ये व जनजागृती करण्यात सोलापूर जिल्हा परिषद यशस्वी ठरली आहे.