
जुनी पेन्शन (Old Pension Scheme) लागू करा, जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांची वेतन त्रुटी दूर करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्या, या प्रमुख मागण्यांसह इतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी जिल्हा परिषदेतील विविध कर्मचारी संघटना मंगळवार 14 मार्चपासून संपावर जाणार आहेत.
सोलापूर : जुनी पेन्शन (Old Pension Scheme) लागू करा, जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांची वेतन त्रुटी दूर करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्या, या प्रमुख मागण्यांसह इतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी जिल्हा परिषदेतील विविध कर्मचारी संघटना मंगळवार 14 मार्चपासून संपावर जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेश देशपांडे (Rajesh Deshpande) यांनी दिली. कर्मचारी संघातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बेमुदत संप जाहीर करण्यात आला.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य गट ड (चतुर्थ श्रेणी ) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ समन्वय समितीने मंगळवार १४ मार्च २०२३ पासून बेमुदत संपात पुकारला आहे. सरकारी निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर, महानगरपालीका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी हे राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी होणार आहेत.
या संपात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व महासंघाच्या संलग्न असलेल्या प्रवर्ग संघटना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, ग्रामसेवक युनियन, लिपिक वर्गीक कर्मचारी, लेखा कर्मचारी संघटना, अभियंता संघटना, स्थापत्य अभियांत्रिकी संघटना, वाहनचालक संघटना, कृषि तांत्रिक, नर्सेस संघटना, आरोग्य कर्मचारी युनियन, आंगणवाडी पर्यवेक्षिका, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक, पशुचिकित्सा व्यवसायिक, जि.प. महिला परिचर, हात पंप / विद्युत यांत्रिक कर्मचारी, कुष्ठरोग कर्मचारी, विस्तार अधिकारी (सां / पं / आयआरडीपी/ समाजकल्याण / आरोग्य) औषध निर्माण अधिकारी, जि.प. प्रशासन अधिकारी संघटना या २१ प्रवर्ग संघटना व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना, दिव्यांग कर्मचारी संघटना, जि.प.पदवीधर कर्मचारी संघटनेतील सदस्य संपात सहभागी होणार आहे.
या पत्रकार परिषदेस महासंघाचे विभागीय सहसचिव दिनेश बनसोडे, कास्ट्राईब जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर, लिपिक संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, लक्ष्मण वंजारी, सचिन मायना, आनंद साठे, रमेश कोळी, प्रमोद सुरेखा जवळकर, नरेंद्र अकेले, शशिकला म्हेत्रे, पांडुरंग कविटकर, सुनंदा सुरवसे, सचिन चव्हाण, भीमाशंकर कोळी, चेतन भोसले, भिवाजी पगारे, यासीन यादगिर, राजू राठोड, कटयाप्पा रकटे, कंत्राटी कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव यांची उपस्थिती होती.
संपात सहभागी होत असल्याबाबतची नोटीस महासंघामार्फत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना व शासनाला देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महासंघाच्या बार्शी, करमाळा, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा मोहोळ, कुडूवाडी, माळशिरस तालुका शाखेकडून संबधित तालुक्याचे तहसीलदार व गट विकास अधिकारी (प) यांना देण्यात आलेली आहे.