स्वार्थासाठी काहींनी दिल्लीची लाचारी स्वीकारली – जयंत पाटील

भाजपवर टीका करताना आ. जयंत पाटील म्हणाले, इतर पक्षांनी काय केले त्यापेक्षा १० वर्षात तुम्ही काय केले त्याचा हिशोब अगोदर सांगा. देश अराजकता व हुकुमशाहीकडे चालला आहे.

    पाथर्डी : स्वार्थासाठी काहींनी दिल्लीची लाचारी स्वीकारली आहे. राजकारणात विचार, संस्कार महत्त्वाचे असतात. आज राहुल गांधी, शरद पवार व‌ उद्धव ठाकरे यांच्या विचारांची देशाला व राज्याला गरज आहे, असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.

    राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नीलेश लंके यांच्या स्वाभीमान जनसंवाद यात्रेचा प्रारंभ सोमवारी मोहटादेवी (ता. पाथर्डी) येथून झाला. यावेळी झालेल्या सभेत आ. पाटील बोलत होते. ते म्हणाले, नीलेश लंके हे सर्वसामान्य जनतेचे लोकप्रतिनिधी आहेत. गेल्या पाच वर्षात विधानसभेत सर्वसामान्य लोकांचे प्रश्न त्यांनी मांडले. ती कला त्यांच्याकडे आहे. दिल्लीत हा ‌सर्वसामान्य जनतेचा आवाज पोहोचण्यासाठी आणि प्रश्न सोडवण्यासाठी लंके यांना संधी दिली पाहिजे.

    भाजपवर टीका करताना आ. जयंत पाटील म्हणाले, इतर पक्षांनी काय केले त्यापेक्षा १० वर्षात तुम्ही काय केले त्याचा हिशोब अगोदर सांगा. देश अराजकता व हुकुमशाहीकडे चालला आहे. कोरोना काळात ५० लाख लोक मृत्युमुखी पडले. परंतु लंके यांनी देशात व महाराष्ट्रात एक नंबर काम केले. एकीकडे लाखो तरुण बेरोजगारी व इतर समस्यांचा सामना करत आहेत. पेपरफुटीमुळे अनेक परिक्षा रद्द कराव्या लागल्या. सामाजिक व आर्थिक परिस्थिती पाहण्यासाठी जातीनिहाय जनगणना का करत नाहीत? दिल्लीसमोर झुकायचे नसल्याने स्वाभिमानाची लढाई सुरू आहे. जे सरदार पळाले आहे ते पाचव्या रांगेत उभे राहतात, अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर आ. पाटील यांनी टीका केली.