जावयानेचं लावली सासरच्या घराला आग, २ मोटर सायकल जळून खाक; गोंदियातील खळबळजनक घटना

गोंदियामध्ये जावयाने सासरच्या घरालाच आग लावल्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील डवकी गावात ही घटना घडली आहे.

    गोंदिया : गोंदियामध्ये जावयाने सासरच्या घरालाच आग लावल्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील डवकी गावात ही घटना घडली आहे. जावयाने लावलेल्या आगीत दोन मोटरसायकल जळून खाक झाल्या आहेत, तर आगीत घराचेही छत जळाले.

    नेमकं काय घडलं? 

    डवकी येथील शंकर राऊत आणि परिवारातील सदस्य हे रात्री झोपले होते. दरम्यान रात्री १ वाजता घराबाहेर अचानक स्फोट झाल्याचा आवाज आला. आवाज येताच शंकर राऊत हे घराबाहेर आले. त्यावेळी त्यांच्या घरासमोर ठेवलेल्या दोन मोटरसायकल आणि घराच्या समोरील छतास आग लागल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी लगेच आरडाओरडा करुन लोकांना जमा केले. परिसरातील नागरिक मदतील धावून आले आणि तातडीने त्यांनी आग विझवली.

    दरम्यान जावई नितेश मधुकर शहारे हा बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन उभा असल्याचे निदर्शनास आले. लोकांना पाहताच त्याने तिथून पळ काढला. या घटनेची देवरी पोलीस स्टेशन येथे तक्रार करण्यात आली आहे.