वडिलांच्या कर्जाला कंटाळून मुलाची आत्महत्या; विष प्राशन करून संपवलं जीवन

पातूर तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील चान्नी पोलिस स्टेशनअंतर्गत (Channi Police) सावरगाव येथे बापाच्या कर्जाला कंटाळून व सोयाबीनच्या उत्पादनात घट (Production Reduce) झाल्यामुळे मुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली.

    खेट्री : पातूर तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील चान्नी पोलिस स्टेशनअंतर्गत (Channi Police) सावरगाव येथे बापाच्या कर्जाला कंटाळून व सोयाबीनच्या उत्पादनात घट (Production Reduce) झाल्यामुळे मुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.18) उघडकीस आली. गजानन राठोड (वय 32) असे मृताचे नाव आहे.

    सावरगाव येथील अल्पभूधारक शेतकरी दशरथ राठोड यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही बँक व सावकाराकडून कर्ज घेऊन सोयाबीन व तूर पिकाची पेरणी केली होती. मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाचा खंड व अज्ञात रोगामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट तसेच बापाने काढलेल्या कर्जाला कंटाळून मुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली.

    कुटुंब हवालदिल

    गेल्या चार-पाच वर्षांपासून अस्मानी संकटामुळे पिकांच्या उत्पादनात घट थांबता थांबेना, असे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. अशातच घरातील मुलाने आत्महत्या केल्याने राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    सावरगावला व्यक्तीने विष प्राशन केल्याने त्याला त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी अकोला येथे नेले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी शवविच्छेदन व नातेवाईकांचे जबाब घेऊन पुढील तपास करण्यात येईल.

    – योगेश वाघमारे, ठाणेदार, पोलिस स्टेशन, चान्नी.