
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक दहावी बोर्ड परीक्षा (Maharashtra Board Exam) सुरु आहे. यामध्ये हजारो विद्यार्थी परीक्षा देत आहेत. पण यात एका विद्यार्थ्याची अक्षरश: 'परीक्षा' होती.
जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक दहावी बोर्ड परीक्षा (Maharashtra Board Exam) सुरु आहे. यामध्ये हजारो विद्यार्थी परीक्षा देत आहेत. पण यात एका विद्यार्थ्याची अक्षरश: ‘परीक्षा’ होती. कारण गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या त्या विद्यार्थ्याच्या वडिलांचे निधन झाले आणि त्याच्यासह कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. तरीही हे दु:ख सहन करत तो परीक्षा देण्यासाठी गेला. परीक्षा देऊन आल्यानंतर त्याने अग्नी दिला.
चोपडा तालुक्यातील चहार्डी गावात घटना घडली. गणेश मोहन मोहिते (वय 33, रा. चहार्डी) असे यामध्ये निधन झालेल्या पित्याचे नाव आहे. चोपडा तालुक्यातील चहार्डी गावातील रहिवासी असलेले गणेश मोहिते हे आई जिजाबाई, पत्नी शिलाबाई, बहीण आणि मुलगा यश यांच्यासह वास्तव्यास होते. गणेश मोहिते हे ग्रामपंचायतीत सफाई कर्मचारी होते. गणेश यांचा मुलगा चहार्डी येथील स्व. श्यामराव शिवराम पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहे. आजारी असलेल्या त्याच्या वडिलांचे निधन झाले.
लहानवयात पितृछत्र हरपले
यश या मुलाचा दहावीचा पेपर असल्याने दुपारी अंत्ययात्रेची वेळ ठेवण्यात आली होती. यश पेपर देऊन घरी आल्यानंतर त्याचे वडील गणेश मोहिते यांचे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. लहानवयात यशचे पितृछत्र हरपल्याने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
घरात मृतदेह अन् दहावीची परीक्षा
वडिलांचे निधन होऊन घरात त्यांचा मृतदेह असताना यश हा दहावीचा पेपर देणार कसा हा प्रश्न होता. पण, शाळेचे मुख्याध्यापक व्ही. आर. सोनवणे यांनीही यशचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून यशसह त्याच्या कुटुंबियांची समजूत घातली. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यशने भावनांना आवर घातला आणि काळजावर मोठा दगड ठेवत यश पेपर देण्यासाठी गेला.