पाटणमध्ये मनसेचे लवकरचं खळखट्याळ! मराठी नामफलकासाठी दिली आठ दिवसाची मुदत

पाटण तालुका व पाटण शहरातील दुकानांवरील नामफलक मराठी भाषेमध्ये असावे असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाटण तालुक्याच्यावतीने तहसीलदार, पोलीस स्टेशन, नगरपंचायत यांना देण्यात आले आहे

    पाटण : पाटण तालुका व पाटण शहरातील दुकानांवरील नामफलक मराठी भाषेमध्ये असावे असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाटण तालुक्याच्यावतीने तहसीलदार, पोलीस स्टेशन, नगरपंचायत यांना देण्यात आले आहे

    सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवरील नावाचे फलक मराठी भाषेमध्ये असावे, याबाबत आदेश दिला होता. त्याची मुदत दि. २५/११/२०२३ रोजी संपली आहे. या तारखेपूर्वी स्थानिक व्यापारी, दुकानदार व इतर आस्थापना यांनी त्यांच्या दुकानांवरील फलक मराठी भाषेमध्ये लिहिणे अपेक्षित होते, परंतु अनेक दुकानांवरील फलक मराठीमध्ये लावलेले नाहीत, त्यामुळे ते फलक सर्वोच्च न्यायालयाचे आदेशा प्रमाणे मराठी भाषेमध्ये लावावे, असे निवेदनात म्हटले आहे.

    यावेळी पाटण तालुका अध्यक्ष गोरख नारकर, तालुका उपाध्यक्ष संजय सत्रे, पाटण शहराध्यक्ष चंद्रकांत बामणे, तालुका उपाध्यक्ष राहुल संकपाळ, अंकुश कापसे, नेरळे विभाग अध्यक्ष राम माने, मरळी विभाग अध्यक्ष हणमंत पवार, हेळवाक विभाग अध्यक्ष समर्थ चव्हाण, मनसैनिक अनिकेत भोमकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    होणाऱ्या संघर्षाला दुकानदार जबाबदार
    लवकरात लवकर इंग्रजी भाषेतील फलक मराठीमध्ये लावले नाहीत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या मनसे स्टाईलने आंदोलन करेल आणि होणाऱ्या संघर्षाला दुकानदार व प्रशासन जबाबदार राहील. आठ दिवसात जर दुकानांचे नामफलक जर मराठी भाषेत झाले नाही तर मनसे तालुक्यात खळखट्याळ करेल, असा इशारा तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांनी दिला.