मंगळवेढ्यात अवकाळीने ज्वारी भुईसपाट; पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी

मंगळवेढ्यात गेली दोन दिवस वादळी वाऱ्‍यासह झालेल्या अवकाळी पावसाने ज्वारीची पिके भुईसपाट झाल्याने शेतकरी वर्ग धास्तावला असून शासनाने तत्काळ नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून हाेत आहे.

    मंगळवेढा : मंगळवेढ्यात गेली दोन दिवस वादळी वाऱ्‍यासह झालेल्या अवकाळी पावसाने ज्वारीची पिके भुईसपाट झाल्याने शेतकरी वर्ग धास्तावला असून शासनाने तत्काळ नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून हाेत आहे.

    काही वर्षापूर्वी मंगळवेढा राज्यात ज्वारीचे कोठार म्हणून परिचीत होता. मात्र पावसाळ्यात सर्व नक्षत्रे कोरडी गेल्यामने मंगळवेढ्याच्या काळ्या शिवारात ३५ हजार ४५७ हेक्टर क्षेत्रा पैकी यंदा केवळ ९ हजार ३४८ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष म्हणजेच ज्वारीची २६ टक्केच पेरणी झाली आहे.

    शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेशी ओल नसतानाही निसर्गावर भरोसा ठेवून महागडी बियाणे, खते आणून काळ्या आईची ओटी भरण्याचे काम केले. मध्यंतरी दिवाळी दरम्यान हलका पाऊस पडल्यामुळे ज्वारी पिकांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळाला. दाेन दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मंगळवेढा, ब्रम्हपुरी, बोराळे, मुंढेवाडी, भाळवणी, निंबोणी परिसरात ज्वारीची पिके भुईसपाट झाली.

    शेतकरी दुहेरी संकटात

    पाऊस कमी व वादळी वारे प्रचंड प्रमाणात असल्यामुळे पिके जमिनदाेस्त झाली. एकीकडे दुष्काळी परिस्थिती असताना दुसरीकडे अवकाळीने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. महसूल विभागाने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.