विशेष मुले रमली निसर्गाच्या सान्निध्यात

  नवी मुंबई (सिद्धेश प्रधान) : पर्यावरणाविषयी (Environment) आवड निर्माण करण्यासाठी पुनर्वसू फाउंडेशन (Punarvasu Foundation) संस्थेने यंदा विशेष जंगल सफारीचे (Special Jungle Tour) नियोजन केले होते. या सफरीचे वैशिष्ट्य म्हणजे गतिमंद मुले होय. नेहमी शाळा, कॉलेजेस विद्यार्थ्यांच्या सहली काढतात; मात्र ते सर्वसामान्य विद्यार्थी असतात. गतिमंद मुलांसाठी (Dynamic) असे उपक्रम फारसे राबवलेले पाहण्यास मिळत नाहीत. आपल्यासोबत असलेल्या सवंगड्यांसोबत एकत्र फिरणे सहसा या मुलांच्या वाट्यास येत नाही. हिच बाब ओळखत आपल्या नेहमीच्या विश्वाव्यतिरिक्त निसर्ग खरखुरा निसर्ग अनुभवण्याचे सुख या मुलांच्या वाट्याला यावे हा उद्देश लक्षात घेत पुनर्वसू फाऊंडेशनने विशेष मुलांसाठी जंगल सफारी आयोजित केली.

  सीबीडी येथे स्वामी ब्रम्हानंद प्रतिष्ठान (Swami Brahmananda Pratishthan) ही विशेष मुलांची शाळा आहे. या विशेष मुलांनादेखील निसर्ग समजायला हवा या उद्देशाने या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. एकूण ४२ मुले आणि शिक्षक या सहलीत सहभागी झाली होती. या मुलांना सीबीडी येथील व्हॅली पार्कमध्ये नेण्यात आले. त्यांना सुरक्षेचे नियम सांगण्यात आले. हिरवाईने नटलेले डोंगर, विविध फुले, पानांवर साठलेले पाण्याचे थेंब या पानांना ही मुले स्पर्श करून अनुभव घेत होते. त्यांनादेखील आनंद मिळत होता.

  विविध पक्ष्यांचे सुमधूर आवाज, खेकडे, विविध प्रकारचे कीटक, सरडे, साप, फुलपाखरे या सर्व गोष्टी प्रत्यक्षात अनुभवताना या मुलांच्या चेहऱ्यावर कुतूहलाचे भाव दिसून येत होते. अनेक मुले फुलांना झाडांना न्याहाळताना दिसत होती. पाणसापांचे दर्शन झाले त्याबद्दलदेखील मुलांना माहिती करून दिली. यासह जंगलाच्या सुरुवातीलाच लावलेल्या सापांच्या माहितीबाबतदेखील जनजागृती करण्यात आली. विविध पक्ष्यांचे आवाज आणि त्या रंगीबेरंगी पक्ष्यांना पाहूनदेखील ही मुले हरखून गेल्याचे पाहण्यास मिळाले. त्यांच्या अडखळत्या प्रश्नांना पुनर्वसूच्या सदस्यांनी तितक्याच प्रेमाने, आदराने उत्तरे दिली.

  पुनर्वसू फाउंडेशनचे अनेक उपक्रम
  व्हॅलीमध्ये पुनर्वसू फाउंडेशननी अनेक उपक्रम राबवले आहेत. सर्पमित्र संघटना म्हणून ही संस्था नावारूपास आली आहे. तसेच, सीबीडीतील व्हॅलीपार्कची निगा राखली जात आहे. याशिवाय या जंगलात विविध खडकांवर प्राण्यांची पक्ष्यांची चित्रे रेखाटत त्यांना जिवंतपणा आणला. पावसाळ्यातील अनेक उन्मळून पडलेल्या झाडांना पुनर्जीवनदेखील दिले आहे.

  हौदाला नैसर्गिक रूप
  पक्षी-प्राण्यांना पाणी पिण्यासाठी बनवण्यात आलेला छोटा हौद या जंगलात पर्यटकांकडून टाकण्यात येणाऱ्या प्लास्टिक आणि दारूच्या बाटल्यांपासून बनवला आहे. त्यात मासेदेखील सोडण्यात आले आहेत. त्यात पक्षीप्रेमींना फोटो टिपता यावेत यासाठी जागा तयार करण्यात आली आहे.