आषाढी एकादशीला पंढरपूरसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या

यावर्षी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने वारकऱ्यांच्या सोयीसाठी ५ ते १५ जुलै यादरम्यान विशेष रेल्वेचे नियोजन केले आहे.

    आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi) वारकऱ्यांचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या (Shree Vitthal-Rukmini) भेटीची ओढ लागली आहे. त्यासाठी पंढरपूर (Pandharpur) येथे येत्या १० जुलै रोजी होणाऱ्या आषाढी वारी (Ashadhi Wari) सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर रेल्वे (Solapur Railway) विभागाकडून दहा दिवसांत रेल्वेच्या १२५ विशेष फेऱ्यांचे (Special Train) नियोजन (Planning) केले असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

    आषाढी एकादशीसाठी मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातून लाखो वारकरी पंढरपूरला रवाना होतात. दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधमुक्तीनंतर यंदा पहिल्यांदाच पंढरीची वारी होणार असल्याने त्या दृष्टीने तयारी सुरू आहे. यावर्षी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने वारकऱ्यांच्या सोयीसाठी ५ ते १५ जुलै यादरम्यान विशेष रेल्वेचे नियोजन केले आहे.

    प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, उपाहारगृह, रुग्णवाहिका, चौकशी कक्ष, संगणकीय उद्‌घोषणा कक्ष अशा सुविधा करण्यात येणार आहेत. आषाढी एकादशीचे औचित्य साधून पुणे-पंढरपूर, कुर्डुवाडी-मिरज, लातूर-मिरज, भुसावळ-पंढरपूर, नागपूर-पंढरपूर, बिदर- पंढरपूर आदी मार्गांवर स्पेशल रेल्वे धावणार आहेत. या गाड्यांत जनरल तिकिटावर वारकऱ्यांना प्रवास करता येणार आहे. गाड्यांमध्ये सामान्य प्रकारच्या डब्यांचा समावेश असणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.