पुणेकरांसाठी विशेष वॉकथॉन; पर्पलथॉन मध्ये तरुणाईचा लक्षणीय सहभाग

रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड बिझनेस मॅनेजमेंट (आयआयइबीएम), रोट्रॅक्ट क्लब ऑफ आयआयइबीएम आणि इंडस चॅम्प्स स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे सकाळी पर्पलथॉन या विशेष वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते

    पुणे – रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड बिझनेस मॅनेजमेंट (आयआयइबीएम), रोट्रॅक्ट क्लब ऑफ आयआयइबीएम आणि इंडस चॅम्प्स स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे सकाळी पर्पलथॉन या विशेष वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते. समाजात अपस्मार शत्रक्रिये विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता ज्या मधे ३५० हून अधिक लोकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. या मधे तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. बालेवाडी क्रीडा संकुलात वॉकथॉन साठी पाच किलोमीटर अंतर निश्चित करण्यात आले होते. ठराविक अंतरावर जलपेय आणि प्रथमोपचार तसेच आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून डॉक्टर्स ही तैनात करण्यात आले होते. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट, ३१३१ च्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन मंजू फडके यांच्या हस्ते झेंडा दाखवून वॉकथॉन ला सुरवात करण्यात आली.

    वॉकथॉन नंतर सध्याचा लोकप्रिय व्यायाम प्रकार झुंबा ची प्रात्यक्षिके झुंबा प्रशिक्षक आणि रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट, 3131 झोन ६ च्या सहाय्यक राज्यपाल स्मिता शितोळे यांनी दाखवली. रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेर च्या पुढाकारातून अपस्मार आजारावर होणाऱ्या शस्त्रक्रिया दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सहकार्याने तेथील अपस्मार विभाग प्रमुख आणि अपस्मार शल्य विशारद डॉ. निलेश कुरवाळे करतात. कार्यक्रमाचा समारोप डॉ. कुरवाळे यांच्या अपस्मार आजारावरील शस्त्रक्रिया या विषयावरील व्याख्यानाने झाले. ते म्हणाले, अपस्मार हा आजार पूर्ण बरा होतो किंवा नियंत्रित राहू शकतो पण या साठी उपचार घेणे आवश्यक असते. जटिल किंवा औषधांना न जुमानणाऱ्या अपस्मार आजारावरील शस्त्रक्रिया ही अत्यंत सुरक्षित असून रुग्ण पूर्ण बरा होतो. ही शस्त्रक्रिया म्हणजे रूग्णासाठी आणि त्याच्या कुटुंबांसाठी जीवन बदलवणारा अनुभव असतो.

    व्यावसायिक सामाजिक जबाबदारी निधी (सीएसआर फंड) तून वंचित रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाते. या माध्यमातून १ जुलै २०२३ पासून आता पर्यंत १५ यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेर क्लबने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे या वेळी क्लब चे अध्यक्ष जिग्नेश कारिया यांनी सांगितले. उपक्रमात रोटेरियन कॅप्टन प्रदीप नाडकर, रोटेरियन प्रिया कारिया, रोटेरियन सपना अग्रवाल, आयआयइबीएम चे असोसिएट डीन डॉ. भोळे, संदीप माने, आयआयइबीएम, रोटरॅक्ट क्लब चे अध्यक्ष, रोट्रॅक्ट प्रणव भेगडे, इंडस चॅम्प स्कूल च्या स्वाती गुप्ता यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.