पालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या हालचालींना वेग!

माण तालुक्यात राजकियदृष्ट्या सर्वात महत्वाची मानल्या जाणाऱ्या म्हसवड नगरपरिषदेची पंचवार्षीक निवडणुक आगामी काही महिन्यात होत असल्याने इच्छुक उमेदवारांनी जाहिर झालेल्या प्रभागातुन आपल्याला विजयी कसे होईल याची चाचपणी सुरु केली आहे.

  म्हसवड : माण तालुक्यात राजकियदृष्ट्या सर्वात महत्वाची मानल्या जाणाऱ्या म्हसवड नगरपरिषदेची पंचवार्षीक निवडणुक आगामी काही महिन्यात होत असल्याने इच्छुक उमेदवारांनी जाहिर झालेल्या प्रभागातुन आपल्याला विजयी कसे होईल याची चाचपणी सुरु केली आहे. मात्र पालिका निवडणुकीसाठी पूर्वीच्या राज्यशासनाने घेतलेले निर्णय नव्या सरकारने रद्द करीत सन २०१७ साली झालेल्या नियमानुसार निवडणुका होणार असल्याचे जाहीर केले आहे. म्हसवड पालिकेची निवडणूक ही २०१६ साली झाली होती, त्यामुळे यंदाची पालिका निवडणुक ही नव्या की जुन्या नियमानुसार व संख्येनुसार होणार याबाबत सामान्य जनतेत संभ्रम आहे. असे असले तरी काही इच्छुकांनी मात्र निवडणूक लढवायचीच या हेतुने मतदारांना साद घालण्यास सुरुवात केली आहे.

  यंदा होणारी पालिका निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. यंदा पालिका निवडणुकीत आ. जयकुमार गोरे यांची सत्ता येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गतवेळी जनतेने आ. गोरे यांच्या पालिकेतील सत्तेला धक्का देत राष्ट्रवादी पुरस्कृत परिवर्तन पॅनेलला नगराध्यक्षासह १० जागेवर निवडून देत पालिकेची सत्ता ५ वर्षासाठी ताब्यात दिली होती. त्यापुर्वी म्हणजे सन २०११ च्या पालिका निवडणुकीत याच म्हसवडकर जनतेने पालिकेची सत्ता ही आ. गोरे यांच्या हाती दिली होती. त्यावेळी आ. गोरेंनी म्हसवड शहरात अनेक विकासकामे करुन म्हसवडचे रुपडे पालटण्याचे काम केले होते. त्यांनी ५ वर्षाच्या कार्यकाळात नगराध्यक्ष पदावर अनेक सामान्य नगरसेवकांना संधी देत त्यांच्या नावावर विविध विकास कामे केली.

  शेखर गोरे यांनी लक्ष काढले
  विकासकामे करुनही २०१६ च्या पालिका निवडणुकीत आ. गोरेंच्या पॅनेलला म्हसवडकरांनी लाथाडत त्यांचेच बंधु असलेल्या शेखर गोरे यांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत परिवर्तन पॅनेलच्या हाती सत्ता दिली. म्हसवडकर जनतेने दिलेला कौल मान्य करीत आ. गोरे यांनी पालिकेत ५ वर्ष कसलेच लक्ष घालणार नसल्याचे स्पष्ट करीत आपल्या मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले. म्हसवडकर जनतेने मोठ्या विश्वासाने पालिकेची सत्ता शेखर गोरे यांच्या हाती दिली खरी मात्र शेखर गोरे यांनी त्या सत्तेत कसलेच मन न दाखवता ही सत्ता म्हसवडकरांच्या स्वाधीन करीत असल्याचे जाहीर करीत पालिकेत ज्यांनी साथ दिली त्यांना सोबत घेवून त्यांच्या सल्ल्याने कामे करा असा सल्ला देत शेखर गोरे यांनी पालिकेतील आपले लक्ष काढले त्यामुळे बेलगाम झालेल्या या सत्ताधाऱ्यांनी पालिकेत मनमानी कारभार सुरु केला. पालिकेतील सत्ताधारी गटाचा उपनगराध्यक्षाच्या खुर्चीवरुन सुरु झालेला सत्तासंघर्ष काही कमी झाला नाही. त्यामुळे आ. गोरे यांच्या सत्तेत मल्टीपर्पज हॉल सेठी आलेला साडे ६ कोटी रुपयांचा निधीही शासनाकडे परत गेला.

  सत्ताधाऱ्यांत एकमत नसल्याचा फटका शहराला
  सत्ताधारी गटात एकमत नसल्याने शहरात यापुर्वी झालेली विकासकामांची अवस्था अक्षरशा बकाल झाली आहे. जे गार्डन सर्व जिल्ह्यासाठी एक रोल मॉडल ठरले होते आज त्याची अवस्था अत्यंत विद्रुप अशी बनली आहे. ज्या स्मशानभुमीत विद्यार्थी अभ्यास करीत होते आज त्याठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तर ५ वर्षापुर्वी उभारलेल्या भाजी मंडईच्या इमारतीची अवस्था अत्यंत घाणेरडी बनली असुन सध्या ती ईमारत जुगारीचा अड्डा तर डुकरांचे अन तळीरामाचे घर बनले आहे अनेकजण तर या इमारतीचा मुतारीसाठी वापर करतानाचे चित्र आहे, पिण्याच्या पाण्याचे तर तीन तेरा कधीच वाजले असुन दोन ते तीन दिवसांतून येणारे पाणी सत्ताधारी गटाच्या मेहरबानीमुळे सध्या ८ ते १० दिवसांवर येवून ठेपले आहे, तर किरकोळ केलेल्या गटाराच्या अन सिमेंट रस्त्याच्या कामाचा दर्जा तर विचारावयास नको असा असल्याने म्हसवडकर जनताच आता पालिका निवडणुकीची अक्षरशा वाट पहात असल्याचे चित्र आहे.

  नागरी सुविधांचा बोजवारा
  सध्या पालिकेत प्रशासकीय राजवट सुरु असल्याने तर विकासकामे त्याचा दर्जा, नागरी सुविधा याचा पुरता बोजवारा उडाल्याचे दृष्य असुन नागरिकांची किरकोळ कामेही होत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहे. तर प्रशासनाला सध्या कोणी विचारणारे़च नाही. त्यामुळे प्रशासनाचा मनमानी कारभार पालिकेत सुरु असल्याचा आरोप म्हसवडकर जनता करीत आहे. प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी अन म्हसवडकरांना हक्काच्या सुविधा मिळण्यासाठी म्हसवडकर जनता ही यंदाच्या पालिका निवडणुकीत आ. गोरेंना साथ देण्याची सर्वाधिक शक्यता असल्याने अनेक इच्छुकांनी आ. गोरे यांच्या भेटी गाठी सुरु केल्या असुन आपण कसे प्रबळ दावेदार ठरु शकतो हे पटवुन देण्याचा त्यांचा प्रयत्न सध्या तरी सुरु आहे. यंदाच्या पालिका निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी या प्रमुख दोन पक्षात लढत होईल अशी अटकळ व्यक्त केली जात असुन राष्ट्रवादी ला या ठिकाणी फार मेहनत घ्यावी लागणार आहे त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनाच फडात उतरावे लागणार आहे.