
पुण्यातील धनकवडी भागात एका भरधाव कारने एकापाठोपाठ सात वाहनांना धडक दिल्याची माहिती समोर आली. या घटनेत तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.
पुणे : पुण्यातील धनकवडी भागात एका भरधाव कारने एकापाठोपाठ सात वाहनांना धडक दिल्याची माहिती समोर आली. या घटनेत तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकांच्या नकळत मुलांनी कार नेल्याचे चौकशीत उघड झाले.
धनकवडीतील आंबेगाव पठार भागातील अल्पवयीन मुलगा मित्रासह भरधाव वेगाने मोटारीतून निघाला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात भरधाव मोटारीने रिक्षाला धडक दिली. अपघातानंतर अल्पवयीन मुलगा घाबरला. भरधाव वेगाने मोटारीतून तो पसार झाला. नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला. अल्पवयीन मुलाचे नियंत्रण सुटले. मोटारीने मोटारी, रिक्षा आणि दुचाकीला धडक दिली. नागरिकांनी पाठलाग करुन अल्पवयीन मुलाला पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात पकडले. अपघातात तिघेजण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मोटारीतील अल्पवयीन मुलांन ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जखमी, तसेच प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवून घेतले आहेत. अपघातानंतर मोठ्या संख्येने नागरिक सहकारनगर पोलीस ठाण्यात जमले. पोलिसांनी पालकांना बोलावून घेतले आहे.